जुने चलन घेतल्याने मोबाईल खरेदी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2016 01:20 AM2016-11-11T01:20:54+5:302016-11-11T01:20:54+5:30
मंगळवारी ५०० व १००० च्या चलनी नोटा बंद झाल्याचा निर्णय होताच शेकडोच्या संख्येत ग्राहकांनी मोठ्या वस्तू खरेदीकडे आपला झेंडा वळविला.
रिचार्जचा धंदा मात्र ढासळला : महागड्या हॅन्डसेटची जोरात विक्री
गडचिरोली : मंगळवारी ५०० व १००० च्या चलनी नोटा बंद झाल्याचा निर्णय होताच शेकडोच्या संख्येत ग्राहकांनी मोठ्या वस्तू खरेदीकडे आपला झेंडा वळविला. मात्र बुधवारी गडचिरोली शहरातील बाजारपेठ बंद असल्याने गुरूवारी सकाळीच दुकान उघडताच ग्राहक मोबाईल खरेदीसाठी दाखल झाले. त्यामुळे शहरातील मोबाईल शोरूममध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसून आली. काही मोबाईल शोरूमधारकांनी १००० व ५०० च्या नोटा ग्राहकांकडून स्वीकारल्या. त्यामुळे मोबाईल विक्री अचानकपणे वाढली. शहरातील डिसेंट मोबाईल शॉपीचे मालक आरीफ खान लोकमतशी बोलताना म्हणाले, अनेकांना आपण १०० व ५० च्या नोटा आणण्यास सांगत आहो. काही लोक आणत आहे. मात्र ज्यांची अडचण आहे. त्यांच्याकडून १००० व ५०० च्याही नोटा आपण स्वीकारल्या, अशी माहिती त्यांनी दिली. शहरातील इतर मोबाईल दुकानातही ग्राहकांची दिवसभर वर्दळ असल्याचे दिसून आले. मात्र रिचार्जचा व्यवसाय करणारे १००० व ५०० च्या नोटा घेत नसल्याचे पूजा दुकानाचे मालक सुरेश सारडा यांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांनी रिचार्जच्या दुकानांकडे पाठ फिरविली व सुट्या पैशाची व्यवस्था करून रिचार्ज मारून घेतले.