भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:51 AM2017-12-16T00:51:45+5:302017-12-16T00:52:17+5:30
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे बीएसएनएलचा भ्रमणध्वनी मनोरा आहे. परंतु मागील सहा महिन्यांपासून येथील सेवा विस्कळीत होत आहे. परंतु या समस्येकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने परिसरातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे बीएसएनएलचा भ्रमणध्वनी मनोरा आहे. परंतु मागील सहा महिन्यांपासून येथील सेवा विस्कळीत होत आहे. परंतु या समस्येकडे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने परिसरातील ग्राहक त्रस्त झाले आहेत.
रेगडी परिसरात बहुतांश भ्रमणध्वनी ग्राहक बीएसएनएलचे आहेत. ग्राहक नियमित सेवेचा उपयोग करीत आहेत. मागील सहा महिन्यांपासून भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत होत आहे. भ्रमणध्वनीवर बोलताना आपोआप संपर्क तुटणे, अनेकदा संपर्क न होणे, संपर्क झालाच तर आवाज न येणे आदी समस्या आहेत. अनेकदा फोन सुरू असतानाही पैैसे कटतात. परंतु आवाज येत नाही. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसानीसह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
रेगडी येथे शासकीय, निमशासकीय कार्यालये, पोलीस मदत केंद्र, हायस्कूल, उच्च प्राथमिक शाळा, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य खासगी प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे येथील ग्राहक दररोज बीएसएनएल सेवेचा वापर करतात. परंतु योग्य सेवा मिळत नसल्याने संबंधित विभागाविषयी ग्राहकांमध्ये तीव्र रोष आहे.
वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालून तत्काळ सेवा सुरळीत करावी, अशी मागणी उपसरपंच रमेश दयालवार, प्रशांत शहा, सुरेश शहा, उमेश मल्लीक यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
ग्रा.पं. ठरावाची दखल नाही
रेगडी ग्राम पंचायतीत ८ नोव्हेंबरला ग्रामसभा पार पडली. या सभेत येथील बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा सुरळीत करण्याबाबत ठराव पारित करण्यात आला. लालसू पावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत भ्रमणध्वनी मनोऱ्याची सेवा सुरळीत करण्याबाबत संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याविषयी चर्चा करण्यात आली. सर्वानुमते ठराव पारित करून संबंधित विभागाला पाठविण्यातही आला. या ठरावाला जवळपास सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे परिसरातील ग्राहकांमध्ये बीएसएनएलप्रती तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.