भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:19 AM2019-03-08T00:19:42+5:302019-03-08T00:20:49+5:30
आदिवासीबहुल अविकसित भामरागड तालुक्यात बीएसएनएलची एकमेव दूरसंचार सेवा आहे. येथे खासगी सेवेचा पर्याय नसताना सुद्धा भ्रमणध्वनीधारकांच्या तक्रारीची बीएसएनएलकडून दखल घेतली जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : आदिवासीबहुल अविकसित भामरागड तालुक्यात बीएसएनएलची एकमेव दूरसंचार सेवा आहे. येथे खासगी सेवेचा पर्याय नसताना सुद्धा भ्रमणध्वनीधारकांच्या तक्रारीची बीएसएनएलकडून दखल घेतली जात नाही. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण तालुक्यातील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. सेवा पूर्णत: ठप्प झाल्याने भ्रमणध्वनीधारक त्रस्त झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी व कर्मचाऱ्याविना बीएसएनएलची भ्रमणध्वनीसेवा नाममात्र सुरू होती. मात्र येथे बीएसएनएलचे अधिकारी रूजू झाल्यानंतर थ्री-जी व टू-जी सेवा सुरळीत होती. मात्र ही सेवा सुद्धा सध्या विस्कळीत झाली आहे. एका ठिकाणाहून फोन लागते तर दुसऱ्या ठिकाणावरून संपर्क होत नाही. गेल्या दोन दिवसांपासून थ्री-जी सेवेच्या लाभापासून भ्रमणध्वनीधारक वंचित आहेत. बीएसएनएलची सेवा पूर्णत: ठप्प झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसानंतर बुधवारी पुन्हा दुपारनंतर बीएसएनएलची टू-जी सेवा सुरू झाली.
यासंदर्भात बीएसएनएलचे अधिकारी दीपक कुमार यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अनेक कारणामुळे सोमवारी एक दिवस सेवा बंद होती. येथे डिजिटल जनरेटर येऊन १५ दिवस झाले. हा जनरेटर सुरू करावयाचा आहे.
येत्या दोन दिवसांत जनरेटर कार्यान्वित करण्यात आल्यानंतर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा अविरत सुरू राहणार आहे. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास चंद्रा गावाजवळ केबल लाईन तुटल्यामुळे सेवा ठप्प झाली. पोलीस विभागाला कळविल्यानंतर तुटलेले केबल आज पुन्हा जोडण्यात आली, १० दिवसानंतर भामरागड तालुक्यात बीएसएनएलची थ्री-जी सेवा सुरू होणार आहे, असे दीपक कुमार यांनी सांगितले.
पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव
भामरागड तालुक्यात मागील पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम होत आहेत. परंतु रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पूर्ववत होत नाही. सोमवारी दिवसा विजेचा लपंडाव होता तर संपूर्ण रात्रभर वीज गायब होती. त्यामुळे नागरिकांना डासांच्या प्रकोपाचा सामना करावा लागला. डासांमुळे रात्री झोपमोड होत आहे. वीज पुरवठा नियमित होत नसल्याने येथील व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विजेअभावी आॅनलाईन कामे करताना अडचणी येत आहेत. परंतु याकडे वीज कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वेळीच उपाययोजना कराव्या, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.