मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची गती मंदावते
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 04:48 PM2024-07-23T16:48:10+5:302024-07-23T16:49:03+5:30
Gadchiroli : डॉक्टरांचा रील्सच्या शैलीने मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आई-वडील आणि मुलगा किंवा मुलगी या त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेचा मोठा परिणाम सध्या पाहायला मिळत आहे. मूल रडले की त्याला उचलून घेण्यास कुणाकडे वेळ नाही. त्यामुळे मुलाचे रडणे थांबविण्यासाठी आपण त्याच्या हातात मोबाइल देतो. मात्र, हाच मोबाइल मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे.
मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होत आहे. ते रील्समधून मातृभाषा सोडून जपानी आणि चिनी भाषा शिकत आहेत. डॉक्टर आता रील्सच्या शैलीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जास्त स्क्रीन टाइममुळे मुले 'ऑटिझम' आजाराला बळी पडत आहेत. रील्स बघत असल्याने आई-वडिलांना त्यांची भाषा समजण्यास अडचण निर्माण होत आहे. दिवसेंदिवस मोबाइलचा अतिरेकी वापर धोकादायक ठरणारा आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
मोबाइल वापरामुळे मुलांवर काय परिणाम ?
जास्त स्क्रीन टाइममुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास थांबतो, मुलांचा विकास पूर्णपणे होण्यात अडथळे निर्माण होतात. मोबाइलच्या व्यसनामुळे शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेले खेळही मुले खेळत नाहीत किंवा ते खेळू शकत नाहीत. सामाजिक जाणिवा आणि कौटुंबिक भावना, नातेसंबंध हेदेखील बाळाला कळत नाहीत, त्यामुळे आता बाळाच्या हाती मोबाइल द्यायचा की त्याला दुसऱ्या खेळात गुंतवायचे तुम्हीच ठरवा.
"स्क्रीन टाइम वाढल्याने ७ वर्षापर्यंतच्या मुलांना ऑटिझमचा त्रास होत आहे. त्यांच्यात भाषेचा विकास होत नाही. पडद्यावर दिसणाऱ्या भाषेतील शब्द ते बोलू लागतात. अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मुलाचे मन इतर खेळांमध्ये रमेल यासाठी प्रयत्न करावेत. त्याला विविध प्रकारच्या कला व खेळ शिकवावेत."
- डॉ. संजय कन्नमवार, बालरोगतज्ज्ञ