वीज बिल भरण्यासाठी मोबाईल व्हॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:30 AM2018-06-20T01:30:56+5:302018-06-20T01:30:56+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच वीज बिल भरता यावा, यासाठी गावात मोबाईल व्हॅन पाठविली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी उपविभागातील घोट शाखा कार्यालयात प्रयोगिकस्तरावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच वीज बिल भरता यावा, यासाठी गावात मोबाईल व्हॅन पाठविली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी उपविभागातील घोट शाखा कार्यालयात प्रयोगिकस्तरावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
विजेसह सर्व साहित्य व उपकरणे महावितरणला नगदी खरेदी करावी लागतात. त्यामुळे १०० टक्के वीज बिलाची वसुली होणे आवश्यक आहे. वीज बिलाच्या वसुलीचे प्रमाण वाढावे, यासाठी महावितरणने आजपर्यंत अनेक उपाय केले आहेत. ग्राहकांना मोबाईल अॅपद्वारा वीज बिल भरण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडे मात्र स्मार्ट फोन राहत नाही. त्याचबरोबर मोबाईल अॅपच्या सहाय्याने वीज बिल भरणे शक्य होत नाही. ग्रामीण भागात वीज बिल वसुलीचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वीज बिलाचा भरणा बँकेत करावा लागतो. १० ते १२ किमी अंतरावर असलेल्या बँकेत जाऊन वीज बिल भरणे शक्य होत नाही. त्यामुळे काही नागरिक पैसे असूनही वीज बिल भरत नाही. गावातच वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मोबाईल व्हॅन सेवा सुरू केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील घोट शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड उपविभागातील पहार्णी, राजुरा उपविभागातील देवाडा, वरोरा तसेच चंद्रपूर उपविभागातही ही सेवा सुरू केली जाणार आहे. आठवडी बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर मोबाईल व्हॅन नेली जाणार आहे. ज्या गावातील वीज बिलाची वसुली कमी आहे, अशा गावांना विशेष प्राधान्य देऊन त्या गावामध्ये व्हॅन जाईल. प्रयोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या या सुविधेचा आढावा तीन महिन्यानंतर घेतला जाणार आहे. नागरिकांकडून मिळणाºया प्रतिसादानंतर त्याठिकाणी ही सुविधा पुढे सुरू ठेवायची की नाही किंवा या सुविधेची व्याप्ती वाढविण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे.
वाहनात राहतील या सुविधा
वीज बिल भरणा केंद्रात संगणक, इंटरनेट आदीची सुविधा उपलब्ध होणार आहे. वीज बिलाचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकाला पावती उपलब्ध करून दिली जाणार आहे. वीज बिल भरणा केंद्र नसलेली गावे, दुर्गम भागातील गावे, दाट लोकवस्ती मात्र मोजकेच वीज बिल भरणा केंद्र असलेली गावे तसेच ज्या गावातील वीज बिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावांमध्ये सदर वाहन नेले जाईल.