नव्या शैक्षणिक सत्रात मॉडेल स्कूलला मिळणार इमारत

By Admin | Published: May 23, 2014 11:50 PM2014-05-23T23:50:48+5:302014-05-23T23:50:48+5:30

केंद्र शासनाच्यावतीने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या गटात मॉडेल स्कूल व मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय मे २०१२ मध्ये घेण्यात आला होता. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मोहली,

Model school to get new academic session | नव्या शैक्षणिक सत्रात मॉडेल स्कूलला मिळणार इमारत

नव्या शैक्षणिक सत्रात मॉडेल स्कूलला मिळणार इमारत

googlenewsNext

गडचिरोली : केंद्र शासनाच्यावतीने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या गटात मॉडेल स्कूल व मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय मे २०१२ मध्ये घेण्यात आला होता. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मोहली, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व अहेरी येथे मॉडेल स्कूल सुरू करण्यात आले आहे. स्वतंत्र इमारती अभावी सध्यास्थितीत मॉडेल स्कूल जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू आहेत. शासनाने जिल्ह्यातील पाच मॉडेल स्कूलच्या बांधकामासाठी १५ कोटी १० हजार रूपये मंजूर केले आहेत. तर मुलींच्या वसतिगृहासाठीही स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. मॉडेल स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिल्या जाते. मॉडेल स्कूल हे ६ वी ते १२ वीतील मुला-मुलींसाठी आहे. या शाळा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्नीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील मोहली, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड व अहेरी या मॉडेल स्कूलमध्ये सध्यास्थितीत १६९ विद्यार्थी व तेवढ्याच विद्यार्थीनी असे एकूण ३३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र मॉडेल स्कूलला स्वतंत्र इमारत नसल्याने विद्यार्थ्यांची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत करण्यात आली आहे. शाळा व वसतिगृहाची स्वतंत्र इमारत झाल्यानंतर मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे. मॉडेल स्कूल बांधकाम व मुलींच्या वसतिगृहासाठी स्वतंत्र ५ एकर जागेची आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने या पाचही शाळांसाठी जागेची व्यवस्था केली असून सातबारा शिक्षण विभागाच्या नावाने केला आहे. त्यामुळे शाळांच्या बांधकामासाठी शासनाने प्रती मॉडेल स्कूल ३ कोटी २ हजार रूपये याप्रमाणे १५ कोटी १० हजार रूपये मंजूर केले आहेत. वसतिगृह बांधकामासाठी प्रति वसतिगृह २ कोटी ६२ लाख मंजूर केले आहेत. दोन्ही योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे उपाध्यक्ष आहेत. मॉडेल स्कूल व गर्ल्स होस्टेलच्या बांधकामाची जबाबदारी सीईओवर देण्यात आली आहे. बांधकाम होत असल्याने मागास क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Model school to get new academic session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.