अनिकेत आमटे यांच्या कल्पकतेतून गडचिरोलीतील वाड्या-वस्त्यांमध्ये अवतरले 'आधुनिक शांतिनिकेतन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 02:51 PM2020-06-13T14:51:03+5:302020-06-13T14:52:05+5:30
लोक बिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या प्रेरणेने व आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने 'शिक्षण तुमच्या दारी' हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी आश्रम शाळा, हेमलकसातर्फे यावर्षी पहिल्यांदाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. 'शिक्षण तुमच्या दारी' या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एक प्रकारे आधुनिक शांतिनिकेतनच या भागात अवतरले असल्याचे दिसत आहे.
यावर्षी कोविड-19मुळे जग हादरुन गेले आहे. सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची द्वितीय सत्रांत परीक्षा न घेता सुटल्या जाहीर करण्यात आल्या. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्चमध्ये घरी सोडण्यात आले. पुढे शाळा कधी सुरू होणार याचीही शाश्वती नाही. चार ते पाच महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची लिंक तुटू नये, शिक्षण ही प्रक्रिया अविरत सुरू रहावी त्यासाठी लोक बिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या प्रेरणेने व आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने 'शिक्षण तुमच्या दारी' हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
लॉकडाऊनमुळे येथील शिक्षक उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वगावी जाऊ शकलेले नाही. त्यामुळे इयत्ता 1 ली ते 9 वी आणि इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग प्रत्यक्ष त्यांचे गावी जाऊन घ्यायचे ठरले. त्यासाठी इ.1 ली ते 9 वीसाठी तालुक्यात 12 केंद्र व इ.10वी , 12 वीसाठी 5 केंद्र निवडण्यात आले. तेंदुपत्यांचा हंगाम संपताच आणि लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच शिकवणी वर्गाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर परिसरातील 2 ते 3 कि.मी. अंतरावरून गावांतील विद्यार्थी पालकांसोबत येतात. एका केंद्रावर दोन शिक्षक याप्रमाणे शासनाच्या लॉकडाउन नियमांचे पालन करीत, सामाजिक अंतर राखून, तोंडावर मास्क लाऊन 20 विद्यार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे गावांतील मोकळ्या जागेत झाडाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. इ.1 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांना बेसिक ज्ञान, गोष्टी, खेळ, लेखन, वाचन, गणितीय क्रिया, इंग्रजी शिक्षण देण्यात येत आहे. इ 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत घेण्यात येत आहेत. सदर शिकवणी वर्ग शाळा सुरू होईपर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रत्येक शिकवणी वर्गाला 95 ते 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतात हे विशेष!
इथे भरतात वर्ग
इ.1 ते 9 वी :- लाहेरी, मल्लमपोडूर, जुव्वी, गोंगवाडा, हिदुर, मिळगुळवेंचा, हलवेर, जिंजगाव, कुडकेली, मन्नेराजाराम, हेमलकसा, बिनागुंडा.
इ. 10 वी 12 वी:- इरपनार, कोठी, हेमलकसा, जिंजगाव, बोटनफुंडी.