मोहसडवा व दारू केली नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:00 AM2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:00:32+5:30
मुक्तिपथ अभियान व गावसंघटनेच्या अथक परिश्रमातून मुरूमगावाला दारूमुक्त गावाची एक ओळख मिळाली. या गावातील महिलांचा दारूविक्रेत्यांवर नियंत्रण असल्यामुळे दारूबंदी कायम टिकून होती. मात्र, माहिनाभरापासून शेतीचे कामे सुरू असल्यामुळे गावसंघटनेच्या महिला व्यस्त होत्या. या संधीचे सोने करीत गाव परिसरातील अवैध दारू विक्रेत्यानी डोके वर काढत घरात व शेतशिवारात दारूचे अड्डे निर्माण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील दारूबंदी असलेल्या मुरूमगाव येथे पोळा सणाचे औचित्य साधून परिसरातील दारू विक्रेत्यांनी डोके वर काढीत दारूचे अड्डे निर्माण केले. याची माहिती गावसंघटनेच्या महिलांना लागताच शेत शिवार व घरांची झडती घेतली. यावेळी दारू अड्यांवरून मोठ्या प्रमाणात मोहसडवा व दारू जप्त करून नष्ट करण्यात आली.
मुक्तिपथ अभियान व गावसंघटनेच्या अथक परिश्रमातून मुरूमगावाला दारूमुक्त गावाची एक ओळख मिळाली. या गावातील महिलांचा दारूविक्रेत्यांवर नियंत्रण असल्यामुळे दारूबंदी कायम टिकून होती. मात्र, माहिनाभरापासून शेतीचे कामे सुरू असल्यामुळे गावसंघटनेच्या महिला व्यस्त होत्या. या संधीचे सोने करीत गाव परिसरातील अवैध दारू विक्रेत्यानी डोके वर काढत घरात व शेतशिवारात दारूचे अड्डे निर्माण केले. पोळ्याला मद्यपींचे जत्थे दाखल होऊन प्रचंड पैसे कमविण्याचे स्वप्न दारू विक्रेते बघत होते. याची माहिती गाव संघटनाच्या महिलांना लागताच मुक्तीपथ तालुका चमू व महिलांची बैठक पार पडली. पोळ्याच्या दिवशीच अहिंसक कृती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
त्यानुसार गावातील महिलांनी शेतशिवारातील दारूविक्रीच्या ६ अड्यांवर व १५ घरांवर धाड टाकून चौकशी केली. दरम्यान शेतशिवारातील तीन व सात घरातून मोठ्या प्रमाणात मोहसडवा व दारू जप्त करून नष्ट करण्यात आला. या अहिंसक कृतीमुळे गावातील व परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा गावात दारूविक्री केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करू, असा इशारा देखील अवैध दारू विक्रेत्यांना महिलांनी दिला आहे. यावेळी मुक्तीपथचे तालुका प्रेरक भाष्कर कड्यामी उपस्थित होते. पोळ्याच्या सणाला ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीला उधाण येत असते. हे ओळखून मुरूमगाव परिसरातील महिला सतर्क झाल्या आहेत.
सिरोंचात दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल
सिरोंचा पोलिसांनी शहरातील चार अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून चौकशी केली. दरम्यान एका दारू विक्रेत्यांकडून तीन लीटर गुळाची दारू जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावसंघटनेच्या पुढाकारातून शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. शहरातील संघटना दारुमुक्त शहर करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. काही दारूविक्रेत्यांनी अवैध व्यवसाय बंद केला आहे. मात्र, शहरातील काही दारूविक्रेते न जुमानता दारूविक्री करीत शहरातील सामाजिक वातावरण दूषित करीत आहेत. याचा अधिक त्रास महिलाना सोसावा लागत होता. पोलिसांनी शहरातील वार्ड क्रमांक ६ मधील चार अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून तपासणी केली. यावेळी एका अवैध दारूविक्रेत्याच्या घरातून दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सिरोंचा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार मारा मडावी, गेडाम, वांदेकर व त्यांच्या सहकार्यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.