महिलांच्या पुढाकाराने मोहसडवा व दारू नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:29+5:30
खरपुंडी येथील गाव संघटनेच्या महिला दारूविक्री बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अहिंसक कृतीच्या माध्यमातून त्या दारू व सडवे नष्ट करीत आहेत. जिल्ह्यात झाडीपट्टी नाट्य उत्सव सुरू झाला आहे. खरपुंडी येथेही एका नाटकाचा प्रयोग आयोजित आहे. या प्रयोगामुळे गावात होणारी गर्दी पाहता कठाणी नदीलगत मोहसडवे टाकण्यात आले असून दारू गाळली जात असल्याची माहिती येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील खरपुंडी गावलगत कठाणी नदीच्या काठाने लावलेल्या दारूभत्त्या, साहित्य, मोहसडवा आणि गावठी दारू मुक्तिपथ गाव संघटनेने नष्ट केली. मंगळवारी गावातील महिलांनी मुक्तिपथ तालुका चमुसह ही कारवाई केली. गावात दंडार नाटकासाठी ही दारू गाळली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
खरपुंडी येथील गाव संघटनेच्या महिला दारूविक्री बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. अहिंसक कृतीच्या माध्यमातून त्या दारू व सडवे नष्ट करीत आहेत. जिल्ह्यात झाडीपट्टी नाट्य उत्सव सुरू झाला आहे. खरपुंडी येथेही एका नाटकाचा प्रयोग आयोजित आहे. या प्रयोगामुळे गावात होणारी गर्दी पाहता कठाणी नदीलगत मोहसडवे टाकण्यात आले असून दारू गाळली जात असल्याची माहिती येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यांनी मुक्तिपथ तालुका चमुला याची माहिती देत अहिंसक कृतीचे नियोजन केले. नऊ महिला आणि तालुका चमुनी मिळून गावालगत कठाणी नदीकाठाजवळील परिसरात शोधमोहीम सुरू केली. ठिकठिकाणी लपवून ठेवलेला मोहसडवा आणि दारू गाळण्यासाठी उपयोगात येणारे साहित्यही सापडले. हे सर्व साठे व साहित्य गाव संघटनेने नष्ट केले.
जवळपास १०० मोहसडवा महिलांनी नष्ट केला. याच दरम्यान एक जण दारू गाळत असल्याचेही निदर्शनास आले. महिलांना पाहून या इसमाने पळ काढला. गाळलेली गावठी दारू आणि भट्टी संघटनेने उद्ध्वस्त केली. मंडईचे निमित्त साधून गावागावांमध्ये दारू गाळण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांनी नाटक असलेल्या गावांमध्ये शोधमोहीम राबविण्याची मागणी गाव संघटना करीत आहे.