सोमवारपासून कृषी सहायकांचे आंदोलन सुरू
By admin | Published: June 13, 2017 12:42 AM2017-06-13T00:42:07+5:302017-06-13T00:42:07+5:30
३१ मे २०१७ च्या शासन निर्णयान्वये मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आली.
काळ्याफिती लावून केले काम : कृषी विभागातील पदे मृद व जलसंधारण विभागाकडे वळविली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयान्वये मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आली. मृद संधारण विभागाकरिता कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्देशित करण्यात आली. मात्र कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित झाला नसल्याने या बाबीचा विरोध करीत कृषी सहायक संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करताना संघटनेला विश्वासात घेण्यात यावे, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची १०० टक्के पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषीसेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी शिक्षण सेवकाप्रमाणे आश्वाशित प्रगती योजना व इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा, आंतर संभागीय बदलीबाबतचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबित आहे. याबाबत निर्णय घ्यावा, आदी मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेतर्फे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
चामोर्शी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सोमवारी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामकाज केले. या आंदोलनात संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय पत्रे, वर्षा कुमरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील बुद्धे, कार्याध्यक्ष योगेश बोरकर, उपाध्यक्ष अनुराधा चौधरी, दीपा क्षिरसागर, शशांक उत्तरवार, ज्ञानेश्वर मसराम, मनोहर दुधबावरे, सोमेश्वर क्षिरसागर, शारदा वाळके, एस. आर. गरमळे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत कृषीसहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे आहेत आंदोलनाचे टप्पे
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीतर्फे कृषी सहायकांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये १२ ते १४ जूनदरम्यान काळ्याफिती लावून कामकाज करणे, १५ ते १७ जूनदरम्यान कृषी सहायक लेखनीबंद आंदोलन करतील. १९ जून रोजी जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने, २१ ते २६ जून दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, २७ जूनला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे त्यानंतर १ जुलै रोजी कृषी आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. १० जुलैपासून कृषी सहायक बेमूदत कामबंद आंदोलन करणार आहेत.