आलापल्लीच्या पोस्ट खात्यातील पैशाला फुटले पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:41+5:302021-06-09T04:45:41+5:30
आलापल्ली : येथील पोस्ट विभागातील अनेकांच्या खात्यांतील रक्कम गायब झाल्याची कुणकुण सुरू आहे. गैरव्यवहार करून ती रक्कम परस्पर लांबविल्याचा ...
आलापल्ली : येथील पोस्ट विभागातील अनेकांच्या खात्यांतील रक्कम गायब झाल्याची कुणकुण सुरू आहे. गैरव्यवहार करून ती रक्कम परस्पर लांबविल्याचा संशय असून पोस्ट विभागाकडून गुपचूप पद्धतीने या प्रकाराची चौकशी सुरू आहे. अनेक ग्राहकांना पत्र पाठवून आलापल्लीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलविले जात आहे.
आलापल्ली आणि परिसरात दैनंदिन बचतखाते, लाईफ इन्शुरन्सचे खाते या पोस्ट ऑफिसमध्ये आहे. सात हजारांपेक्षा जास्त नागरिक या ठिकाणी खातेदार असून आतापर्यंत अनेक लोकांना त्यांच्या खात्यात भरलेली रक्कम आणि खात्यावरील जमा रक्कम येऊन तपासणी करण्यासाठी पत्र दिले आहे.
याप्रकरणी अधिक चौकशीसाठी सदर प्रतिनिधीने पोस्ट कार्यालयात विचारणा केली असता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगत तेथील कर्मचाऱ्यांनी जास्त माहिती देण्यास नकार दिला.
(बॉक्स)
डाक कर्मचारी आणि एजंटचे संगनमत?
- सन २०१७ पासून खातेधारकांच्या खात्यात गैरप्रकार झाला असल्याचे कळते. डाक विभागातील तत्कालीन कर्मचारी आणि आर.डी. एजंट यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाला असल्याची कुजबूज खातेधारकांमध्ये आहे. काही आर. डी. एजंट पैसे नियमित नेत होते पण ती रक्कम पोस्टात भरणाच केली नाही, ग्राहकांना त्यांचे पासबुकही देत नव्हते, पासबुक पोस्ट ऑफिसला जमा आहे, असे सांगून वेळ मारून नेली जात होती, असे काही ग्राहकांनी सदर प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
- एखाद्या ग्राहकाने पासबुक मागून घेतलेच तर एंट्री झाली नाही, कार्यालयात कॉम्प्युटर अपडेटचे काम सुरू आहे, नंतर करून देणार आहे, असे सांगितले जात होते. एखादा ग्राहक जर आपले पासबुक घेऊन डाक कार्यालयात पोहोचलाच तर लिंक नाही, नंतर या, असे उत्तर दिले जात होते.