मानधन प्रलंबित; कर्मचारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 01:27 AM2016-07-24T01:27:54+5:302016-07-24T01:27:54+5:30
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंतचे मानधन प्रलंबित आहे.
१ आॅगस्टला धरणे देणार : ग्रा.पं. कर्मचारी संघटनेची माहिती
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंतचे मानधन प्रलंबित आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरून मानधन देण्यात दिरंगाई होत आहे. यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद समोर एक हजार कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार व अध्यक्ष मनोज पेंदोर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १ आॅगस्ट २०१३ पासूनच्या सुधारीत किमान वेतनासाठी जि.प.ला अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र असे असताना सुध्दा डिसेंबर २०१५ पासूनचा निधी अद्यापही वितरित करण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन तत्काळ अदा करण्यात यावे, शासनाकडून आलेला किमान वेतनाचा निधी तत्काळ वितरित करावा, कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका अद्यावत करण्यात याव्या, भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करावी, सेवाज्येष्ठता यादी अद्यावत करावी या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जि.प.समोर धरणे देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बाबुराव बावणे, जांभुळकर, नितीन किनेकार, एकनाथ गोटे, मालकर, सुरेश पर्वतकर, शेषराव मेश्राम आदी हजर होते. (प्रतिनिधी)