पावसाने उडाली दाणादाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:17 PM2018-07-16T23:17:15+5:302018-07-16T23:24:06+5:30
जिल्ह्यात रविवारी रात्रभर बरसलेल्या पावसाने गडचिरोली शहरासह जिल्ह्याला जलमय करून टाकले. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची दाणादाण उडाली. सोमवारी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात ७०.६ मिमी पाऊस झाला. गडचिरोली शहर आणि मंडळात सर्वात जास्त २३५ मिमी पावसाची नोंद झाली. गडचिरोली तालुक्यासह धानोरा, चामोर्शी, मुरचेरा, एटापल्ली आणि भामरागड या सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. प्राणहिता नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेला एक इसम डोंगा उलटल्याने वाहून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात रविवारी रात्रभर बरसलेल्या पावसाने गडचिरोली शहरासह जिल्ह्याला जलमय करून टाकले. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची दाणादाण उडाली. सोमवारी सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्ह्यात ७०.६ मिमी पाऊस झाला. गडचिरोली शहर आणि मंडळात सर्वात जास्त २३५ मिमी पावसाची नोंद झाली. गडचिरोली तालुक्यासह धानोरा, चामोर्शी, मुरचेरा, एटापल्ली आणि भामरागड या सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. प्राणहिता नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेला एक इसम डोंगा उलटल्याने वाहून गेला.
रविवारी रात्री ९ च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस थांबता थांबत नव्हता. संपूर्ण रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे गडचिरोली शहरात नाल्या तुंबून रस्त्यावर साचलेले अनेक घरांमध्ये शिरल्याने मध्यरात्रीपासून त्या नागरिकांची तारांबळ सुरू झाली. गडचिरोली शहराच्या सखल भागाला बेटाचे रूप आले होते. भामरागड शहरालगतच्या पर्लकोटा नदीचे पाणी मध्यरात्रीच पुलावर चढले होते.
अहेरी तालुक्यात प्राणहिता नदीत डोंगा उलटून व्यंकटेश शंकर सिडाम (२५) रा.वांगेपल्ली हा युवक वाहून गेला. त्याच्यासह इतर दोघे जण नदीत मासेमारी करण्यासाठी गेले होते असे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र इतर दोघे पाण्यातून बाहेर येण्यात यशस्वी झाले. व्यंकटेशचा शोध घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.
अनेक नद्यांचे पाणी पुलावर, गावकऱ्यांनी दाखविले औदार्य
गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलावर सोमवारी दुपारनंतर ४.३० वाजता पाणी चढले. त्यामुळे हा मार्ग रात्री उशीरापर्यंत बंदच होता. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवनीजवळील पोटफोडी नदी पुलावर दुपारी १ वाजता पाणी चढले. पोटेगाव, राजोली, देवापूर ते पोटेगाव, कुनघाडा-पोटेगाव हे मार्ग बंद पडले होते.
भामरागडजवळील पर्लकोटा नदी पुलावर पाणी चढल्याने सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. १२ वाजतानंतर पुलावरील पाणी ओसरले. मात्र रात्री ९ च्या सुमारास पुन्हा पुलावर पाणी चढल्याने संपर्क तुटला. बांडीया नदी पुलावर पाणी असल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद होता. धोडराजजवळचा नाला भरल्याने लाहेरी परिसरातील गावे संपर्काबाहेर होती. जुव्ही नाल्यामुळे नेलगुंडा परिसर, होडरी नाल्यामुळे होडरी परिसर, गुंडेनूर नाल्यामुळे बिनागुंडा परिसर, विसामुंडी नाल्यामुळे विसामुंडी परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता. ताडगाव नाल्यावर पाणी असल्याने आलापल्लीकडे जाणाऱ्या तीन बसेसमधील जवळपास १५० प्रवाशी ताडगावजवळ अडकले. गावकऱ्यांनी त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली.
एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गट्टा मार्ग बंद होता. गट्टा मार्गावरील आलदंडी गावाजवळील बांडे नदीला पूर आल्याने हा मार्ग बंद आहे. तसेच एटापल्ली-जारावंडी मार्गावरील देवदा ते हालेवारा दरम्यान असलेल्या जुव्ही नाल्यावर पाणी चढल्याने सदर मार्ग बंद पडला. पुलावरून मार्ग ओलांडू नये, यासाठी एटापल्लीचे ठाणेदार सचिन जगताप यांच्या नेतृत्वात बचाव पथक व पोलिसांचा बंदोबस्त होता. डुम्मी नाल्यावर पूर आल्याने डुम्मी, जव्हेली, मरपल्ली, वासामुंडी या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला.
धानोरा तालुक्यातील येरकड, मालेवाडा-कारवाफा-पुस्टोला, गोडलवाही-जारावंडी मार्ग लहान मोठ्या नाल्यांवरील पुरामुळे बंद पडले होते.
गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडले
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या ३३ दरवाजांपैकी ३१ दरवाजे अर्धा मीटरने उचलण्यात आले आहेत. ३३९५ क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह सिंचन प्रकल्प ३१.२३ टक्के भरले आहे. चामोर्शी तालुक्यातील रेगडी जलाशय ३८.५२ टक्के, कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा लघु प्रकल्प ७७.१७ टक्के भरले आहे.
वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गडचिरोली तालुक्यातील बामणी येथे असलेल्या सरीता मापण केंद्रावर सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता कठाणी नदीने इशारा पातळी ओलांडली होती. अहेरी तालुक्यातील सरीता मापण केंद्रावर प्राणहिता नदीची पातळी इशारा पातळीच्या ०.६० मीटरने वर गेली. त्यामुळे प्रशासनाने जवळपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
माता व बाळाला प्रशासनाने पोहोचविले सुखरूप
पामुलगौतम नदीपलिकडे असलेल्या झारेगुडा येथील शांती देवू मडावी ही महिला प्रसुत झाली. दवाखान्यातून तिची सुटी झाली. मात्र नदीचा प्रवाह वाढला. त्यामुळे या नदीतून दैनंदिन चालणाऱ्या बोटेतून नेणे नवजात बाळ व मातेला धोकादायक होते. ही बाब उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार कैलास अंडील यांना माहित झाली. त्यांनी तत्काळ सदर महिलेसाठी डिझेलवर चालणारी बोट उपलब्ध करून दिली. सोबतच बचाव पथकाचे कर्मचारीही उपलब्ध करून दिले. बचाव पथकाच्या संरक्षणात सदर महिलेला नदी पार करून देण्यात आले. यासाठी भामरागडचे ठाणेदार सुरेश मदने, पीएसआय होनमाने, सुसत्कर कर्नेवाड, आरएफओ चव्हाण, डॉ. कांबळे, बोट चालक गणेश डोंगरे, सहायक सदानंद पाडी यांनी सहकार्य केले.
७० बसफेऱ्या रद्द
गडचिरोली आगारातून सुटणाऱ्या ७० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील पोटफोडी नदीवर पाणी असल्याने चामोर्शी व पलिकडच्या संपूर्ण बसफेऱ्या रद्द केल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-खेडी-हरणघाट-चामोर्शी मार्गे काही बसफेऱ्या सुरू केल्या. कठाणी नदी पुलावर दुपारी ४.३० वाजता पाणी चढले. त्यामुळे नागपूर, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडाकडे जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. नागपूरसाठी काही बसफेऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी मार्गे सोडण्यात आल्या. तर नागपूरवरून येणाऱ्या संपूर्ण बसेस पाथरी मार्गेच वळविण्यात आल्या. मौशीखांब, धानोरा, रांगी या बसफेºया सुध्दा बंद होत्या. अहेरी आगारातून सोडल्या जाणाऱ्या भामरागडच्या सहा फेऱ्या, देवलमरीच्या चार व गडचिरोलीच्या दोन फेºया रद्द करण्यात आल्या.
गडचिरोली मंडळात सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांपैकी ९ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यात सर्वाधिक २३५.६ मिमी पाऊस गडचिरोली मंडळात झाला. याशिवाय बामणी मंडळात २०५ मिमी पावसाची नोंद झाली. पोर्ला मंडळात १८५ मिमी, धानोरा मंडळात १५०.४ मिमीे, एटापल्ली मंडळात ११६.४ मिमी, गट्टा मंडळात १२२.६ तर भामरागड मंडळात ११८ मिमी पाऊस झाला आहे.
पावसामुळे कोसळली घरे
एटापल्ली येथील ममता नरेश मडावी, माया चरणदास दोनाडकर, पेंगडपल्लीवार, जीवनगट्टा येथील चोप्पा दंडीवार यांच्या घराचे नुकसान झाले.
अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव बुज येथील पंचफुला नारायण अलोणे यांच्या घराची भिंत सोमवारी पहाटे कोसळली. सदर भिंत बाहेरील बाजुने पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तलाठी राजेंद्र आव्हाड यांनी मोका पंचनामा करून पाहणी केली.
गडचिरोली तालुक्यातील नवेगाव, मुरखळा येथील आशाताई कोरडे यांचे घर कोसळले. १९८० च्या कालावधीत बांधण्यात आलेल्या पोटेगाव येथील रेस्ट हाऊसची एका बाजुची भिंत पडली. पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक चिकणे, मारगोनवार यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
२४ वर्षानंतर अनुभवला जोरदार पाऊस
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांत पावसाचे प्रमाण सरासरी जास्त असते. मात्र गडचिरोली शहरात तुलनेने पाऊस कमीच असतो. मात्र रविवारच्या रात्री शहरात झालेला तब्बल २३५.६ मिमी पाऊस अनेक वर्षांचा रेकॉर्ड तोडणारा होता. तब्बल २४ वर्षानंतर असा पाऊस पाहिल्याचे अनेक लोकांनी सांगितले.
१९९४ मध्ये गडचिरोली शहरात असाच मुसळधार पाऊस झाला होता. पण त्यावेळी २४ तासात किती पाऊस झाला होता याची नोंद सध्या जिल्हा प्रशासनाकडे नाही. पण तेव्हापासून म्हणजे २४ वर्षानंतर हाच सर्वाधिक पाऊस असल्याचे लोक खात्रीलायकपणे सांगतात. त्यावेळी पाऊस सतत सुरू असल्यामुळे कठाणी नदीचा पूर दोन दिवसांपेक्षा जास्त काळपर्यंत कायम होता. परिणामी आरमोरी, वडसा, ब्रह्मपुरीकडून होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
पहाटे ५ पासून नगराध्यक्ष झाल्या सतर्क
शहरात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाल्याचे समजताच नगराध्यक्ष योगीता पिपरे पहाटे ५ वाजताच सतर्क झाल्या. शहरवासीयांचे फोन येणे सुरू होताच त्यांनी अनेक भागात जाऊन पाहणी केली. सखल भागात पाणी साचू नये म्हणून स्थायी उपाययोजना करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शहरातील तलावालगत काही नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. या परिसरातील मशीदीच्या आवारात पाणी शिरले होते. तिथे जाऊन नगराध्यक्ष पिपरे यांनी पाहणी केली. तसेच कॅम्प एरिया, आरमोरी मार्ग, कठाणी नदीपर्यंतच्या भागात त्यांनी पाहणी केली. तलावाचा गाळ अनेक वर्षांपासून काढलेला नाही. त्यामुळे तलाव लवकर भरून पाणी घरांमध्ये शिरते. यावर उपाय म्हणून तलावातील गाळ काढण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे विवेकानंदनगर व कन्नमवारनगर वासीयांना फटका बसला. या परिसरात लगतच्या जंगलातील पाणी येऊन साचू नये, यासाठी ठोस उपाय -योजना करणार असे त्यांनी सांगितले.
जीव धोक्यात घालू नका
पुढील दोन दिवस जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नदी, नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असेल तर अशा स्थितीत पूल ओलांडून जीव धोक्यात घालू नये, नदी, नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असेल तर अशा ठिकाणी जाणे टाळावे. आपल्या राहत्या ठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ होत असेल तर सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. तत्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनशी अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. नदी काठावर असणाऱ्या लोकांनी विशेष सतर्कता बाळगावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. मदतीसाठी ०७१३२-२२३१४२, ०७१३२-२२३१४९ या दुरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.