दीड महिना टंचाईचे सावट
By admin | Published: February 13, 2016 12:50 AM2016-02-13T00:50:20+5:302016-02-13T00:50:20+5:30
वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी खोल गेली असून नळ योजनेच्या नदी पात्रातील इनटेक वेल व जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
गडचिरोलीकर त्रस्त : न.प. प्रशासनाच्या लेटलतिफ कारभाराचा फटका
गडचिरोली : वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी खोल गेली असून नळ योजनेच्या नदी पात्रातील इनटेक वेल व जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ८ जानेवारीपासून पालिकेच्या वतीने दिवसातून केवळ एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. या कामाची निविदा विलंबाने काढण्यात आली असून सदर काम करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आणखी दीड महिना गडचिरोली शहरात पाणी टंचाई जाणवणार आहे.
गेल्या महिनाभरापासून पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरातील सर्व वार्डात दिवसातून केवळ एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अनेक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जे कुटुंबधारक केवळ नळ पाणी योजनेच्या भरवशावर आहेत, त्यांची प्रचंड पंचाईत होत आहे. महिनाभरापूर्वी सदर समस्या निर्माण झाली.
मात्र नगर परिषद प्रशासनाने सदर समस्या मार्गी लावण्यासाठी गतीने कार्यवाही केली नाही. दोन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनामार्फत इनटेकवेल व जॅकवेलमधील साचलेला गाळ साफ करणे, पोकलँड मशीनने नदीपात्र खोल करणे, सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधणे, तसेच इनटेकवेलवर लोखंडाचे कुंपण तयार करणे या कामाची निविदा काढण्यात आली.
सदर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालिकेला पुन्हा आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर संबंधित कंत्राटदारास कामाचे आदेश देण्यात येईल. जवळपास १ मार्चपासून सदर काम सुरू होण्याची शक्यता आहे. सदर काम पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे.
त्यामुळे गडचिरोली शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व पुरेशा प्रमाणात होण्यासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यात पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
नळ पाईपलाईन लिकेज दुरूस्तीसाठी कंत्राटदार मिळेना
शहरातील सर्वच २३ वार्डात अनेक ठिकाणी नळ पाईपलाईन लिकेज होते. त्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही तर काही कुटुंबांना मुळीच पाणी मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नळ पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामाची निविदा काढण्यात आली. मात्र या कामासाठी शहरातील एकाही कंत्राटदाराने निविदा भरली नाही. न.प. प्रशासनामार्फत सदर निविदेत नळ पाईपलाईन लिकेज झाल्याची माहिती मिळताच पाच दिवसाच्या आत संबंधित कंत्राटदाराला दुरूस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा लागेल, अन्यथा पाच दिवसानंतर प्रती दिवस ५०० रूपये दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात येईल, ही अट ठेवण्यात आली. त्यामुळे कंत्राटदाराने नळ पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामाकडे पाठ फिरविली आहे.
एक महिन्यानंतर काढली निविदा
नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असून इनटेक व जॅकवेलमध्ये गाळ साचल्याने ८ फेब्रुवारीपासून अपुरा पाणी पुरवठा होत आहे. मात्र तेव्हापासून पालिका प्रशासनाने सदर समस्या मार्गी काढण्यासाठी कोणतेही पाऊले उचलली नाही. तब्बल महिनाभरानंतर पालिका प्रशासनाने या कामाची निविदा काढली आहे. पालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शहरातील नागरिक न.प.प्रती रोष व्यक्त करीत आहेत.