नक्षलपीडित नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारले स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:26 AM2017-11-24T00:26:49+5:302017-11-24T00:27:02+5:30
एकीकडे नक्षलवाद्यांनी पोलिसांना सहकार्य करणाºया नागरिकांचे हत्यासत्र सुरू केले असताना दुसरीकडे यापूर्वी नक्षली हिंसाचाराला बळी पडलेल्या सामान्य नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/अहेरी : एकीकडे नक्षलवाद्यांनी पोलिसांना सहकार्य करणाºया नागरिकांचे हत्यासत्र सुरू केले असताना दुसरीकडे यापूर्वी नक्षली हिंसाचाराला बळी पडलेल्या सामान्य नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकसहभागातून त्यांचे स्मारक उभारण्याचा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे.
गेल्यावर्षी २२ मे रोजी पोलिसांचा खबºया व एसपीओ (गावातील विशेष पोलीस अधिकारी) असल्याच्या संशयावरून राजाराम (खांदला )येथील व्यंकटेश मुत्ता आत्राम या आदिवासी युवकाची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राजाराम येथील आदिवासी बांधवांनी स्मृती स्मारक उभारले. गुरूवारी या स्मारकाची विधिवत पूजा करण्यात आली. अहेरी उपविभागात उभारलेले हे पहिलेच स्मारक आहे.
यावेळी राजाराम उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धनंजय विटेकरी, पोलीस उपनिरीक्षक खतावकर, सपाटे, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांच्यासह गावातील आदिवासी बांधवांनी उपस्थिती दर्शवून स्मारकाची पूजा केली व व्यंकटेश आत्राम यांना श्रद्धांजली वाहिली.
एटापल्ली पोलीस स्टेशनअंतर्गत दोड्डी येथे गेल्यावर्षी तान्या ईरपा कुळयेटी व रैनू दोहे होयामी यांची नक्षलवाद्यांनी गावात येऊन निर्घृण हत्या केली होती. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २२ नोव्हेंबर रोजी दोड्डी या गावात गावकºयांच्या सहभागातून नक्षलविरोधी स्मारक बनविण्यात आले. यावेळी सर्व गावकºयांनी नक्षलविरोधी घोषणाही दिल्याचे पोलिसांनी कळविले.