नेंडेरमध्ये उभारले नक्षलवाद्यांनी स्मारक
By admin | Published: August 2, 2015 01:41 AM2015-08-02T01:41:35+5:302015-08-02T01:41:35+5:30
तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या नेंडेर गावात मुख्य रस्त्याच्या कडेला २७ जुलैच्या मध्यरात्री नक्षलवादी ...
परिसरात दहशत : एटापल्लीपासून २० किमी अंतर आहे गाव
एटापल्ली : तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या नेंडेर गावात मुख्य रस्त्याच्या कडेला २७ जुलैच्या मध्यरात्री नक्षलवादी संघटनांच्या सदस्यांनी शहीद नक्षलवांद्याच्या स्मरणार्थ स्मारक उभारल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
हेडरी पोलीस मदत केंद्रांतर्गत नेंडेर हे गाव आहे. हेडरीपासून दहा किमी अंतरावर व पोलीस मदत केंद्र गट्टापासूनही १० किमी अंतरावरील एटापल्ली-गट्टा मार्गावर असलेल्या नेंडेर गावाच्या जिल्हा परिषद शाळेपासून ३०० मीटर अंतरावर गावाला लागूनच हे स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक उभारून चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. मुख्य मार्गावर हा प्रकार घडलेला असून दुर्गम व अतिदुर्गम भागात यामुळे दहशत पसरली आहे. २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह साजरा केला जात आहे. याच मार्गावर एटापल्लीपासून १२ किमी अंतरावर तसेच प्रत्येकी चार ते पाच किमी अंतरावर नक्षल पत्रक व बॅनरही माओवाद्यांनी लावले असून त्यात शहीद सप्ताह साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी नक्षलवादी संघटनेकडून एलपीजी सप्ताहादरम्यान स्मारक उभारली जातात. पिपली बुर्गी, मेढरी, वेळमागळ, कोडूनवर्ष, ताडगुळा, मंगठा, उडेरा, हाजबोळी, कुंडूम आदी ठिकाणी गावात स्मारक उभारली आहे. त्यामुळे या भागातील माओवाद्यांचा ग्रामीण जनतेवरचा प्रभाव अजुनही कमी झाल्याचे दिसून येत नाही. (तालुका प्रतिनिधी)