मुरूम कार्यवाही थंडबस्त्यात

By admin | Published: July 27, 2014 12:07 AM2014-07-27T00:07:40+5:302014-07-27T00:07:40+5:30

चार दिवसांपासून संततधार पावसाने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात कहर केला. दमदार पावसामुळे चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डींगच्या मागे कन्नमवार वार्ड यासह शहरातील अन्य सखल

The mooring process cools down | मुरूम कार्यवाही थंडबस्त्यात

मुरूम कार्यवाही थंडबस्त्यात

Next

गडचिरोली : चार दिवसांपासून संततधार पावसाने गडचिरोली शहरासह जिल्हाभरात कहर केला. दमदार पावसामुळे चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डींगच्या मागे कन्नमवार वार्ड यासह शहरातील अन्य सखल भागात पाणी साचले. पावसामुळे अंतर्गत रस्ते चिखलमय झाले. यामुळे नागरिकांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावे लागले. आताही पावसाने आपला कहर सुरूच ठेवला आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचणाऱ्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याची योजना न.प. प्रशासनाच्यावतीने दरवर्षी राबविण्यात येते. मात्र यावर्षी नगर परिषद कर्मचाऱ्यांचा संप आला. त्यामुळे मुरूम टाकण्याच्या निविदा प्रक्रियेला उशीर होत आहे. या प्रक्रियेला आणखी महिनाभराचा कालावधी लोटणार असल्याने महिनाभरानंतरच पाणी साचणाऱ्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याची कार्यवाही होणार आहे.
नगर परिषदेच्यावतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला पाणी साचणाऱ्या सखल भागातील मार्गांवर मुरूम टाकण्याची कार्यवाही केली जाते. याबाबत नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत रितसर ठरावही घेतला जातो. यावर्षी मुरूम टाकण्याच्या कारवाई संदर्भात नगर परिषदेच्या स्थायी समितीत ठराव पारित झाला आहे. शहरात जवळपास ४५० ते ५०० ब्रास मुरूम टाकण्याची आवश्यकता भासत असते. याकरीता न.प. प्रशासनाला महसूल विभागाकडे रॉयल्टी भरावी लागते. मुरूम टाकण्याच्या कार्यवाहीसाठी नगर परिषद प्रशासनाला निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराला मुरूम टाकण्याचे आदेश द्यावे लागतात. नगर परिषदेला स्वत: मुरूम टाकण्याची कारवाई करण्यासाठी न.प. प्रशासनाकडे पुरेसे वाहन व कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांमार्फतच मुरूम टाकणे शक्य आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेला अद्यापही सुरूवात झाली नाही. त्यामुळे महिनाभरानंतरच पाणी साचणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर मुरूम पडणार असल्याचे चिन्ह आहेत. यामुळे नागरिकांना चिखल तुडवतच पाण्यामधून मार्गक्रमण करावे लागणार आहे. न.प. प्रशासनाने तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून अंतर्गत मार्गांवर मुरूम टाकण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. न.प. प्रशासनाच्यावतीने पाणी साचणाऱ्या अंतर्गत मार्गाचे अद्यापही सर्व्हेक्षण करण्यात आले नसल्याची माहिती आहे. यामुळे कोणत्या वार्डातील कोणत्या अंतर्गत मार्गावर मुरूम टाकायचे याचे नियोजन अद्यापही झाले नसल्याचे समजते. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र मुरूमाचा पत्ता नाही. नगर परिषद प्रशासनाने उन्हाळ्यातच नियोजन केले असते तर आतापर्यंत पाणी साचणाऱ्या अंतर्गत मार्गावर मुरूम टाकण्याची कार्यवाही पूर्ण होणे शक्य होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The mooring process cools down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.