१७ ग्रामपंचायतींतील सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:47 AM2021-02-05T08:47:56+5:302021-02-05T08:47:56+5:30
देसाईगंज : देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या १७ ग्रामपंचायतींचे निकाल नुकतेच हाती आले असून, येथील १७ ही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी ...
देसाईगंज : देसाईगंज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या १७ ग्रामपंचायतींचे निकाल नुकतेच हाती आले असून, येथील १७ ही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी समर्थित ग्रामविकास परिवर्तन पॅनलने बाजी मारली आहे. यातच सरपंचपदाची आरक्षण सोडत येत्या दि. ४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार असली तरी सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अनेकांनी यासाठी दावे-प्रतिदावे करत सरपंचपदाची माळ आपल्याच गळ्यात पाडण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
देसाईगंज तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या एकूण ५९ प्रभागांतील एकूण १६१ उमेदवारांसाठी १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीचे नुकतेच निकाल जाहीर करण्यात आले आहेत. १६१ उमेदवारांपैकी २६ उमेदवार आधीच अविरोध निवडून आले आहेत. यात तब्बल २१ महिला, तर पाच पुरुषांचा समावेश आहे. यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारांत महिला उमेदवारांची एकूण संख्या ८६ झाली आहे, तर पुरुष उमेदवारांची एकूण संख्या ७५ झाली आहे. १३५ उमेदवारांसाठी तब्बल ३१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. दरम्यान, निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडी समर्थित ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली असल्याने तालुक्याच्या ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे सरपंच विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी बोळधा येथे उद्धवराव गायकवाड, कोंढाळा येथे नितीन राऊत, कसारी येथे विलास बन्सोड, कोकडी येथे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष परसराम टिकले, शिवराजपूर येथे रमेश वाढई, पोटगाव येथे नरेंद्र गजपुरे, विहीरगाव येथे रमेश हारगुळे, आमगाव येथे प्रभाकर चौधरी, एकलपूर येथे विजय सहारे, ज्ञानदेव पिलारे, चोप येथे राधेश्याम बरैया, शंकरपूर येथे विनायक वाघाडे, विसोरा येथे माजी न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यादवराव ठाकरे, शिवसेनेचे भरत जोशी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविण्यात आल्या हाेेत्या त्यात त्यांना यशही मिळाले आहे.