कोरोनात 50 टक्क्यांहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्च रक्तदाबामुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 05:00 AM2020-12-29T05:00:00+5:302020-12-29T05:00:17+5:30
काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती होत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होत होता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस्त होते. सुरूवातीच्या कालावधीत कोरोनाची भयंकर भिती होती
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या एकूण मृत्यूपैकी ५० टक्क्याहून अधिक रूग्णांचा मृत्यू उच्चरक्तदाबाने झाला आहे.
बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. धडधाकट व्यक्ती कोरोनापासून सहज मुक्त होत होते. मात्र वयोवृध्द नागरिक तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग व इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होत होती. तालुकास्तरावर असलेल्या बहुतांश रूग्णांना जिल्हास्थळी हलवावे लागत होते. काही रूग्ण अतिशय गंभीर स्थितीत भरती होत असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होत होता. २८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १०१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मृत्यू पावलेल्यांपैकी ५० टक्केपेक्षा अधिक रूग्ण हायपरटेन्शनने ग्रस्त होते. सुरूवातीच्या कालावधीत कोरोनाची भयंकर भिती होती. त्यामुळे उच्च रक्तदाबग्रस्त रूग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा रक्तदाब आणखी वाढत होता. तसेच मधुमेहग्रस्तही कोरोनाचे बळी पडले आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वयाचे विश्लेषण केल्यास बहुतांश व्यक्ती ६० वर्षांच्या पुढील वयाचे असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात जे एकूण मृत्यू झाले, त्यामध्ये २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. सर्वाधिक कमी वयाचा रूग्ण २२ वर्षांचा असून तो देसाईगंज येथील आहे. वाढत्या वयाबरोबरच अनेक आजार वाढतात. तसेच वयोवृध्द नागरिकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असल्याने कोरोनापासून धोका होत होता. त्यामुळेच वयावृध्द नागरिकांनी गर्दीत जाऊ नये. तसेच अनावश्यक प्रवास करू नये, असा सल्ला आरोग्य विभागामार्फत दिला जात होता.
मधुमेह आहे, काळजी घ्या !
उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह असलेल्या रूग्णांना कोरोनापासून धोका आहे. मधुमेहग्रस्त रूग्णाला कोरोनाची लागण झाल्यास त्याची प्रकृती गंभीर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेहग्रस्त नागरिकांनी कोरोना होणार नाही,यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच ज्या रूग्णांना मधुमेह आहे अशांनी तत्काळ रूग्णालयात भरती होण्याची गरज आहे. मधुमेहग्रस्त रूग्णावर वेळीच उपचार झाल्यास कोरोनापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून खबरदारी घेण्याची गरज आहे.
रोग लपविल्याने अनेकांचा गेला जीव
कोरोनाची लागण होऊनही काही रूग्ण खासगी रूग्णालयातच इतर उपचार करीत होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात ते भरती होत होते. त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे.