क्षमतेपेक्षा अधिक गिट्टीचे सुरू आहे उत्खनन
By admin | Published: May 23, 2016 01:22 AM2016-05-23T01:22:36+5:302016-05-23T01:22:36+5:30
आरमोरी तालुक्यातील गणेशपूर क्रमांक २ लगत असलेल्या मोठ्या देवाच्या डोंगरीवर मागील अनेक दिवसांपासून कंत्राटदाराकडून गिट्टीचे क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन सुरू आहे.
महसूल विभागाचे दुर्लक्ष : गणेशपूर डोंगरीवरील प्रकार
वैरागड : आरमोरी तालुक्यातील गणेशपूर क्रमांक २ लगत असलेल्या मोठ्या देवाच्या डोंगरीवर मागील अनेक दिवसांपासून कंत्राटदाराकडून गिट्टीचे क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन सुरू आहे. शासनाचा अत्यंत कमी महसूल अदा करून या भागातील काही खासगी कंत्राटदार गणेशपूर डोंगरीवर मोठ्या प्रमाणात गिट्टीचे उत्खनन करीत आहेत. मात्र याकडे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
गणेशपूरलगत असलेली मोठ्या देवाच्या डोंगरी उत्कृष्ठ दगड आणि झाडा झुडूपांनी व्याप्त आहे. या डोंगरीवर असलेल्या दगडांना आणि गिट्टीला इमारत बांधकामासाठी मोठी मागणी आहे. आरमोरी तालुक्यातील काही कंत्राटदार या डोंगरीवर गिट्टीचे उत्खनन करण्यासाठी शासनाकडे महसूल अदा करतात. मात्र १०० ब्रॉसचा महसूल अदा करून या डोंगरीतून एक हजार ब्रॉस गिट्टीचा उपसा करीत असल्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटदारांनी चालविला आहे.
गणेशपूर डोंगरीवरील या प्रकारामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. आरमोरी तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या आशीर्वादाने सदर काम चालू असल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन नियमानुसार गिट्टीचे उत्खनन करण्यास कंत्राटदारांना भाग पाडावे तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेशपूर डोंगरी परिसरात गिट्टी उत्खननाच्या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.