जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावांना एसटी बसची अजुनहीं सुविधा नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 03:59 PM2024-04-27T15:59:11+5:302024-04-27T16:02:27+5:30
७३६ गावांतील नागरिकांना एसटीची सेवा : उर्वरित गावातील लोकांना पायदळ गाठावे लागते तालुकास्थळ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील एकूण १ हजार ६७५ गावांपैकी केवळ ७३६ गावांपर्यंतच एसटीची सुविधा पोहोचली आहे. उर्वरित गावांतील नागरिकांना पायदळ एखादे मोठे गाव गाठावे लागते. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे; मात्र माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावी पायदळ किंवा सायकलने जावे लागते.
देशाच्या विकासात रस्ते व वाहतूक व्यवस्थेचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच प्रत्येक गाव रस्त्याने जोडण्यावर शासन भर देत आहे; मात्र गडचिरोली जिल्ह्यातील काही गावांपर्यंत रस्ता बांधणे शक्य नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना पायवाटेचा अधार घेत जगाशी संपर्क साधावा लागतो. पावसाळ्यात तर नाल्यांवरून पाणी राहत असल्याने चार महिने जगाशी संपर्क तुटलेला असते.
एसटी हे सामूहिक वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गावांपर्यंत एसटीचे जाळे पसरले असावे, अशी अपेक्षा आहे. आपल्या गावापर्यंत एसटी यावी, हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. त्यासाठी ते पाठपुरावाही करतात; मात्र अजूनपर्यंत निम्म्याही गावांपर्यंत एसटी पोहोचू शकली नाही. परिणामी येथील नागरिकांना पायदळ किंवा सायकलने गाव गाठावे लागते. शक्यतो जास्तीत जास्त एसटी पोहोचविण्याची आवश्यकता आहे.
खासगी प्रवासी वाहनेही कमी
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात खासगी प्रवास वाहनांची संख्या कमी आहे. येथील नागरिकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ते दुचाकी खरेदी करू शकत नाहीत. खासगी प्रवाशी वाहनांची संख्यासुद्धा कमी आहे. त्यामुळे सायकल किंवा पायदळ प्रवास केल्याशिवाय पर्याय राहत नाही.
एसटी पोहोचलेल्या गावांची संख्या
तालुका एकूण गावे एसटी सेवा
देसाईगंज ३९ २६
आरमोरी १०३ ५५
कुरखेडा १२८ ७७
कोरची १३३ ३९
धानोरा २२८ ७१
गडचिरोली १२८ ८१
चामोर्शी २०४ १४५
मुलचेरा ६९ ४२
एटापल्ली १९७ ४८
भामरागड १९८ २३
अहेरी १८४ ७०
सिरोंचा १४८ ५९
एकूण १६८९ ७३६
मानव विकास मिशनचाही लाभ नाही
विद्यार्थिनींना शाळेपर्यंत प्रवास करण्यासाठी शासनाने अहेरी व गडचिरोली या दोन्ही एसटी आगारांना जवळपास १०० बस उपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र याही बस दुर्गम भागातील गावांपर्यंत जात नाहीत. तालुक्यातील मुख्य रस्त्याने धावतात. विशेष करून दुर्गम भागात १० ते १२ किमीपर्यंत माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा नाहीत. विद्यार्थ्यांना तेवढे अंतर पायदळ जावे लागते.
एसटी हे शासनाच्या अखत्यारीत येणारे महामंडळ आहे. त्यामुळे केवळ नफ्यावर जोर न देता नागरिकांना सेवा देण्याचा उद्देश एसटीने बाळगला पाहिजे. प्रत्येक गावापर्यत एसटी पोहोचणे शक्य नाही. मात्र जास्तीत जास्त गावांपर्यंत एसटी सेवा पूरवावी.
- सुमीत करमकर, नागरिक
दुर्गम भागाच्या विकासाकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. जास्तीत जास्त गावे एसटीने जोण्यासाठी प्रयत्न करावा. खासगी प्रवाशी वाहनधारक प्रवाशांची प्रचंड लूट करतात. मुख्य मार्गावरही बसची संख्या वाढविण्याची गरज आहे.
- संदीप येनगंटीवार, नागरिक