मच्छरदाणी वाटपात दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:03 AM2017-12-01T00:03:44+5:302017-12-01T00:04:04+5:30
राज्य शासनाच्या वतीने गडचिरोलीच्या जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला यंदा १ लाख १९ हजार मच्छरदाण्या वाटपासाठी उपलब्ध झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाच्या वतीने गडचिरोलीच्या जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला यंदा १ लाख १९ हजार मच्छरदाण्या वाटपासाठी उपलब्ध झाल्या. याशिवाय गतवर्षीच्या उरलेल्या ४३ हजार मच्छरदाण्या शिल्लक होत्या. या सर्व मच्छरदाण्या शासकीय व अनुदानित आश्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करावयाच्या होत्या. शिवाय हिवताप संवेदनशील भागात जंगलालगतच्या गावात या मच्छरदाण्या वाटप करावयाच्या होत्या. मात्र आतापर्यंत केवळ २१ हजार २०० मच्छरदाण्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आश्रमशाळांपर्यंत अद्यापही मच्छरदाण्या पोहोचल्या नाहीत. एकूणच जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत मच्छरदाण्या वाटपाच्या कामात दिरंगाई होत आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने उपलब्ध असलेल्या मच्छरदाण्या आवश्यक त्या ठिकाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. यासंदर्भात वाटपकृती कार्यक्रमही आखण्यात आला. त्यानुसार सिरोंचा, मुलचेरा, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना मच्छरदाण्या पुरवठा करण्याचे नियोजन होते. मात्र जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडे वाहन नसल्याच्या सबबीवरून मच्छरदाण्या वाटपाच्या कामात गती देण्यात आली नाही.
नागपूर येथील सहायक संचालक (हिवताप) यांच्याकडील जुने चारचाकी मिनी ट्रक गडचिरोली येथे आणून या वाहनाची किरकोळ दुरूस्ती करण्यात आली. या वाहनातून आतापर्यंत केवळ सिरोंचा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मच्छरदाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मच्छरदाण्या पुरविण्यात आल्या आहेत. हिवताप विभागातर्फे आतापर्यंत सिरोंचा व मुलचेरा तालुक्यातील एक प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून केवळ २१ हजार २०० मच्छरदाण्या पुरवठा करण्यात आल्या आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत १ लाख ४१ हजार ७०० मच्छरदाण्याचे वाटप करावयाचे होते. मात्र १ लाख २० हजार ५०० मच्छरदाण्या अद्यापही प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आश्रमशाळांपर्यंत पोहोचविण्यात आल्या नाहीत. नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यातच हिवतापाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नोव्हेंबरपूर्वीच मच्छरदाण्या पोहोचविणे गरजेचे होते.
आॅक्टोबरमध्ये ४४२ रुग्ण आढळले
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत दर महिन्याला आजारी पडणाºया नागरिकांचे रक्त नमूने घेऊन हिवतापासंबंधी तपासणी करण्यात येते. त्यानुसार आॅक्टोबर महिन्यात सदर कार्यालयाच्या कर्मचाºयांमार्फत जिल्हाभरात नागरिकांची हिवताप तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण ४४२ हिवताप पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पीव्ही स्वरूपाचे ६७ व पीएफ स्वरूपाचे ३७५ रुग्णांचा समावेश आहे. गतवर्षी व यापूर्वीच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाची साथ कमी आहे. हिवताप पॉझिटीव्ह रुग्णांची संख्याही कमी आहे. मात्र डिसेंबर महिन्यात हिवतापाची साथ वाढू नये, यासाठी मच्छरदाणीचा वापर होणे आवश्यक आहे.
दोन विद्यार्थ्यांमागे एक मच्छरदाणी
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध असलेल्या मच्छरदाण्या वाटपाचे नियोजन करण्यात आले. अहेरी, भामरागड, गडचिरोली हे तिन्ही आदिवासी विकास प्रकल्प मिळून शासकीय व अनुदानित अशा एकूण १०० आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांना दोन विद्यार्थ्यामागे एक मच्छरदाणी हिवाळ्यात वापरावयासाठी वितरित करणे गरजेचे होते. तशा शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या सूचनाही होत्या. मात्र मच्छरदाणी वाटपात दिरंगाई होत असल्याने त्याचा वापर विद्यार्थ्यांना करता येत नसल्याचे दिसून येत आहे. आता तरी डिसेंबर महिन्यात सदर मच्छरदाण्या लवकरात लवकर आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या, अशी मागणी होत आहे.