डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:39 AM2021-08-26T04:39:30+5:302021-08-26T04:39:30+5:30
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, ...
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटक यांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने फवारणी करून डास व कीटक यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंड बस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकरांच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
शाळा आवारात जनावरांचा वावर
आलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही, तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालीत आहेत. काेविडमुक्त भागातील शाळा सध्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान पावसाळ्यात विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढविणे गरजचे आहे. मात्र या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
शासकीय इमारतीची पुनर्बांधणी करावी
गडचिराेली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करणे गरजेची आहे. ही कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मोकळे भूखंड दुर्लक्षित
अहेरी : शहरात बहुतांश ठिकाणी शासकीय मोकळे भूखंड आहेत. त्यामुळे या भूखंडावर बगिचा, क्रीडांगण साकारून शहराच्या सुंदरतेत आणखी भर टाकावी, अशी मागणी करण्यात आली असून निवेदनही देण्यात आले आहे.
कार्यालयातील तक्रारपेट्या गायब
आरमाेरी : शासकीय कार्यालयात काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र बहुतांश कार्यालयातील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. दरम्यान, तक्रार करण्यासाठी सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी
चामाेर्शी : आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाहीत. राज्य शासनाने निधीची तरतूद करावी.