डास व कीटक वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:31+5:302021-06-20T04:24:31+5:30

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. मोकळी जागाही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, ...

Mosquitoes and insects grew | डास व कीटक वाढले

डास व कीटक वाढले

Next

एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. मोकळी जागाही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती होत असून आरोग्य धोक्यात आले आहे. फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करावा.

वनविभागात पदे रिक्त

आलापल्ली : जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वन कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून, लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.

डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा धुमाकूळ प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्यावतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात आहे.

डासनाशक फवारणीची मागणी

गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्या आहेत.

अट शिथिल करा

गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. ती अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.

वास्तूची दुरुस्ती करा

सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून मागणी हाेत आहे.

याेजनांची जागृती करा

आलापल्ली : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे. दुर्गम भागात अनेक लाेकांना याेजनांची मुळीच माहिती मिळत नसल्याचे दिसून येते.

दत्त मंदिरात सुविधा द्या

आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे मंदिर आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे, परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून, मंदिर परिसरात सोईसुविधा देण्याची मागणी होत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.

लाईनमनची पदे भरा

एटापल्ली : महावितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे वीज सहायकाची कमी पदे मंजूर आहेत. तालुक्यातील गावे जंगलांनी वेढली आहेत. दुर्गम भागातील वीजपुरवठा लवकर सुरळीत हाेत नाही.

वाहनांवर कारवाई नाही

भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने, रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत.

गाेलाकर्जीत कव्हरेज गुल

अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांचा संपर्क आहे. त्यामुळे समस्या साेडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

काेपरअल्ली मार्ग खड्ड्यांत

मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व नागरिकांना होत आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

भूमीअभिलेखची पदे रिक्त

एटापल्ली : उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात १७ मंजूर पदांपैकी केवळ आठ पदे भरलेली आहेत. मुख्य उपअधीक्षकाचे पद रिक्त असून, सिरोंचा येथील अधिकाऱ्याकडे या पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना एटापल्ली व सिरोंचा अशा दोन ठिकाणचा पदभार चालविणे कठीण झाले आहे.

पूल निर्मितीची मागणी

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूर भागात नदी व नाल्यांची संख्या मोठी आहे. अनेक गावांना जाताना नाले लागतात. मात्र, या नाल्यांवर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात न आल्याने नागरिकांना पावसाळ्यात पाण्यातूनच आवागमन करावे लागते. मात्र, या समस्येकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

अल्पवयीन बनले चालक

गडचिरोली : शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन वाहनधारकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, याकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक पोलीस केवळ चारचाकी वाहनांवर अधिक कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस चौकी सुरू करा

गडचिरोली : गडचिरोली आगार व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र, या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित राहत नाही. अनेकदा ही पोलीस चौकी कुलूपबंद दिसून येते. बसस्थानकातील पोलीस चौकी नियमित सुरू ठेवावी.

Web Title: Mosquitoes and insects grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.