सर्वाधिक क्षयरुग्ण अहेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:19 AM2017-09-12T00:19:16+5:302017-09-12T00:19:34+5:30
नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ३६१ रुग्ण सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात क्षयरोगाचे एकूण १ हजार ३६१ रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे क्षयरोगामध्ये अहेरी तालुका सर्वाधिक प्रभावित असून या तालुक्यात तब्बल २३२ क्षयरुग्ण आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय रुग्णालये आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत मोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. मात्र शासकीय रुग्णालय व आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. एकूणच गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात शासकीय आरोग्याच्या सुविधा तोकड्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात हिवताप व क्षयरोगाचा प्रकोप होत असतो. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यात ११९ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. भामरागड ६९, चामोर्शी १७१, धानोरा ९५, गडचिरोली १६०, एटापल्ली ८८, कोरची ५४, कुरखेडा ८७, मुलचेरा ७४, सिरोंचा १२२ व देसाईगंज तालुक्यात ९० क्षयरुग्ण आढळून आले आहेत.
अहेरी उपविभागातील सिरोंचा तालुक्यातही क्षयरुग्णांची संख्या मोठी आहे. अहेरी उपविभागातील अनेक दुर्गम गावांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. तसेच प्रशासनातर्फे प्रभावी जनजागृती होत नाही. त्यामुळे सतत २० ते २५ दिवस खोकला असूनही बरेच नागरिक तपासणी करीत नाहीत. परिणामी अशा रुग्णांना क्षयरोग झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे क्षयरोगाबाबत नागरिकांनी दक्ष असणे गरजेचे आहे.
गडचिरोली जिल्ह्यात हत्तीपाय रुग्णांची संख्या हजारावर आहे. अशा विविध रुग्णांवर वेळीच औषधोपचार करण्यासाठी दुर्गम भागात शासकीय आरोग्याच्या सोयीसुविधा वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातही क्षयरोगावरील औषधसाठा नेहमीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. क्षयरोगाबाबत प्रबोधनासोबतच जनजागृतीही आवश्यक आहे. क्षयरोगावर उपचार करण्यास विलंब झाल्यास संबंधित रुग्ण दगावतो.
सतत दोन आठवड्यापर्यंत खोकला असल्यास संबंधित व्यक्तींनी तत्काळ तपासणी करून घ्यावी, वेळेवेर औषधी घेतली पाहिजे. सतकर्ता बाळगून काळजी घेतल्यास क्षयरोग हा लवकरच नियंत्रणात आणता येतो. आरोग्य विभागातर्फे क्षयरुग्णांची तपासणी मोफत केली जात असून त्यांना औषधीही मोफत पुरविली जात आहे.
- डॉ. सुनील मडावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, गडचिरोली