मोस्ट वाँटेड नक्षल हस्तकास जंगलात ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:07 PM2024-06-01T23:07:01+5:302024-06-01T23:07:16+5:30

पेरिमिली येथे सी- ६० पथकाची कारवाई: शासनाने ठेवले होते दीड लाखांचे बक्षीस

Most wanted naxal master shackled in forest | मोस्ट वाँटेड नक्षल हस्तकास जंगलात ठोकल्या बेड्या

मोस्ट वाँटेड नक्षल हस्तकास जंगलात ठोकल्या बेड्या

संजय तिपाले /गडचिरोली : जवानांवर हल्ला करणे, जाळपोळ करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे अशा गंभीर स्वरुपांच्या विविध गुन्ह्यांत मोस्ट वाँटेड असलेल्या माओवाद्यांच्या हस्तकास १ जूनला सी- ६० पथकाने जेरबंद केले. भामरागड तालुक्यातील पेरिमिली जंगलात ही कारवाई करण्यात आली. त्याच्या डोक्यावर शासनाचे दीड लाखांचे बक्षीस होते.

 सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा (वय २३, रा. तोयामेट्टा, ता ओरच्छा, जि. नारायणपूर , छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे. 
  अहेरी उपविभागांतर्गत  पेरिमिली उपपोलिस ठाणे हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित होते. तेव्हा तो संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. तो कट्टर माओवादी समर्थक असून २०२० पासून माओवाद्यांसाठी काम करायचा. माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना बैठकीसाठी जबरदस्तीने एकत्रित आणणे,   पोलिसांविरुध्द कट रचणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे  करीत होता. पोलिस अधीक्षक  नीलोत्पल ,   अपर अधीक्षक (अभियान)   यतीश देशमुख  ,  कुमार चिंता ,  एम. रमेश , उपअधीक्षक (अभियान)  विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. 
....

एक खून, तीन चकमकीसह स्फोटाचेही गुन्हे
सोमा तिम्मावर एकूण सात गुन्हे नोंद आहेत. छत्तीसगडच्या कुतुल (जि. नारायणपूर) येथील  आगुळी वडदा या निरपराध व्यक्तीच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२०- २१ मध्ये कुतुल (जि. नारायणपूर) जंगल परिसरातील सोनपूर  येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीतही तो सामील होता. २०२१ मध्ये दुरवडा जि. नारायणपूर  जंगलात तसेच २०२२ मध्ये मोहंदी जि. नारायणपूर  गावाजवळील जंगल परिसरात हाकीबोडा पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.  याशिवाय  कोकामेटा   गावातील पुलावर स्फोट घडविला होता. यात चार जवान शहीद झाले होेते. मोहंदी तसेच कुतुल   रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवल्याचा गुन्हाही त्याने केला होता. 
 

Web Title: Most wanted naxal master shackled in forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.