माता व बालकांचा सर्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:26 AM2018-06-15T00:26:03+5:302018-06-15T00:26:03+5:30
महत्त्वाच्या लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही गरोदर माता व बालक वंचित राहू नये, यासाठी १४ जून ते ३ जुलैपर्यंत शोधमोहीम राबविली जाणार आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या बालक व गरोदर मातांना लसीकरण केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महत्त्वाच्या लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही गरोदर माता व बालक वंचित राहू नये, यासाठी १४ जून ते ३ जुलैपर्यंत शोधमोहीम राबविली जाणार आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या बालक व गरोदर मातांना लसीकरण केले जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये शासन सर्वच महत्त्वाच्या लस मोफत उपलब्ध करून देत असले तरी दुर्गम भागातील गरोदर माता लस घेत नाही. परिणामी तिला व तिच्या बाळाला अनेक प्रकारचे रोग होतात.
ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत २८१ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील गरोदर व बालकांचा शोध घेऊन त्यांना योग्य ते लसीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आरोग्य विभागाने मात्र जिल्ह्यातील सर्वच १ हजार ६७६ गावांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. आशावर्कर वंचित गरोदर माता व बालकांचा शोध घेणार आहेत.
आरोग्य विभाग बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असला तरी अजूनपर्यंत आरोग्य विभागाला पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. गावस्तरावर असलेल्या आशावर्कर गरोदर माता व लहान बालकांची नोंद ठेवतात. गरोदर मातेला प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही दिला जातो. मात्र दुर्गम भागातील महिलांना रूग्णालयाचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे त्या घरीच प्रसुती होतात. प्रसुतीदरम्यान अडथळे निर्माण झाल्यास किंवा तब्येत बिघडल्यास शेवटच्या क्षणी रूग्णालयात भरती केले जाते व काही मातांना जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी रूग्णालयातील प्रसुतीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. यासाठी दुर्गम व ग्रामीण भागातील गरोदर माता व बालकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक झाले आहे.
साधन व रस्त्यांअभावी अडचणीत भर
गरोदर मातांना प्रसुतीसाठी रूग्णालयात भरती करण्यास तिचे कुटुंबिय राजी असले तरी पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गरोदर मातेला रूग्णालयात भरती करणे शक्य होत नाही. परिणामी सदर मातेला गावातच प्रसुती व्हावे लागते. नदी, नाल्यांमुळे आरोग्य कर्मचारीही वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात गरोदर मातांना अगोदरच भरती करणे आवश्यक आहे.
तीन टप्प्यात लसीकरण
सर्वेक्षणादरम्यान जे बालक व गरोदर माता लसीकरणापासून वंचित असल्याचे आढळून आले आहे. त्यांना तसेच इतरांना पहिल्या टप्प्यात १६ जुलैपासून सप्ताह आयोजित करून लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण सप्ताहाचा दुसºया टप्पा १३ आॅगस्टपासून व तिसरा टप्पा १० सप्टेंबरपासून आयोजित केला जाणार आहे.
बालकांना बीसीजी, पेंटा-३, गोवर, मेंदूज्वर, त्रिगुणी लस दिली जाणार आहे. गरोदर मातांचा शोध घेऊन त्यांच्या बाकी सेवांचा लाभ दिला जाणार आहे. जोखमीच्या माता, तीव्र रक्तक्षयीत मातांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य तो उपचार केले जाणार आहेत. मानव विकास मिशनच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.