जन्मदात्यांची वेडी माया... चिमुकल्या भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमी पायपीट

By संजय तिपाले | Published: September 4, 2024 10:10 PM2024-09-04T22:10:47+5:302024-09-04T22:11:29+5:30

दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.

mother and father 15 km walk carrying the bodies of the little siblings on their shoulders | जन्मदात्यांची वेडी माया... चिमुकल्या भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमी पायपीट

जन्मदात्यांची वेडी माया... चिमुकल्या भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमी पायपीट

संजय तिपाले

गडचिरोली : आजोळी आलेल्या दोन भावडांना ताप आला. अशिक्षित आई- वडिलांनी त्यांना दवाखान्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले अन् तेथेच घात झाला. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला, पण उशीर झाला होता. अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेने ४ सप्टेंबरला आरोग्यसेवेची विदारक स्थिती उजेडात आली आहे.

बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा ता. अहेरी) अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे. दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते. ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई- वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली. सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दुपारी १२ वाजता दिनेशनेही प्राण सोडले. जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई- वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली.

आई- बापाची भाबडी आशा, पण...

दोन्ही भावंडांच्या मृत्यूने वेलादी दाम्पत्याला शोक अनावर झाला. मात्र, भाबड्या आशेपोटी दोन्ही मुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली, पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते,त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. मजल- दरमजल करत ते चालत राहिले. त्यानंतर नातेवाईकाची दुचाकी बोलावून त्यावरुन ते पत्तीगावला पोहोचले.

दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होेते. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडलेले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी ऐकले नाही. या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल मागविण्यात येईल. - डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली
 

Web Title: mother and father 15 km walk carrying the bodies of the little siblings on their shoulders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.