शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:52+5:302021-07-14T04:41:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मग वरिष्ठ महाविद्यालये का सुरू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मग वरिष्ठ महाविद्यालये का सुरू केली जात नाहीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व प्राध्यापकांनाही पडला आहे. दरम्यान, विद्यार्थी संघटनाही महाविद्यालये सुरू करण्याची मागणी करीत आहेत.
गडचिराेली येथील गाेंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिराेली हे दाेन्ही जिल्हे मिळून एकूण १७३ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये विज्ञान, कला, वाणिज्य आदी शाखांसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मिळून जवळपास ७२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १५ जुलैपासून विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू हाेत आहेत. महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे. काेराेना नियमांचे पालन करून ती सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
काेट...
एटापल्लीसारख्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे. कव्हरेजचीही समस्या भारी आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनाही अडचणी येत आहेत. काेराेनाचे नियम पाळून महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करता येतील. शासन व विद्यापीठाचे आदेश प्राप्त झाल्यावर वर्ग भरविण्यात येतील.
- डाॅ. एस. एन. बुटे, भगवंतराव महाविद्यालय, एटापल्ली
..........
चामाेर्शीसारख्या अनेक ठिकाणच्या काही महाविद्यालयांत विद्यार्थी पटसंख्या माेठी आहे. एका वर्गात १०० ते १२५ विद्यार्थी असणे, वर्ग भरविताना काेराेनाचे नियम पाळणे अशक्य आहे. मात्र शासन, विद्यापीठाचे आदेश मिळाले, तर पालकांच्या संमतीने महाविद्यालयातील वर्ग सुरू करण्यात येतील.
- डाॅ. डी. जी. म्हशाखेत्री, देवतळे महाविद्यालय, चामाेर्शी
..........
काेराेनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरू केली पाहिजेत. गेल्या शैैक्षणिक वर्षात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने निर्णय घेऊन सर्वच शाळा, महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी आहे.
- स्नेहल कडस्कर
..........
ऑनलाईन शिक्षण पर्याय हाेता. परंतु प्राॅक्टिकलचे शिक्षण कसे मिळणार? त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. ऑनलाईन व प्रत्यक्ष शिक्षणात बरीच तफावत आहे. आता रुग्णसंख्या घटली असल्याने महाविद्यालये सुरू केली पाहिजेत.
- संपदा भाेयर