खासदारांनी केले रवी येथील मरप्पा कुटुंबांचे सांत्वन
By Admin | Published: May 24, 2017 12:33 AM2017-05-24T00:33:54+5:302017-05-24T00:33:54+5:30
तालुक्यातील रवी येथील वामन दशरथ मरप्पा यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते.
भेट घेतली : आर्थिक मदत तत्काळ देण्याचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील रवी येथील वामन दशरथ मरप्पा यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. खासदार अशोक नेते यांनी मरप्पा यांच्या कुटुंबियांची सोमवारी भेट घेऊन सांत्वन केले. वाघाला तत्काळ पकडण्याचे निर्देश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, महिला भाजपा जिल्हाध्यक्ष रेखा डोळस, तालुका महामंत्री मुकूंदा मेश्राम, रोशनी भैसारे, गीता कुळमेथे, जावेद अली, वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर, वनरक्षक तिजारे आदी उपस्थित होते.
वन विभागाच्या मार्फतीने मरप्पा कुटुंबाला तातडीने २० हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. उर्वरित ७ लाख ८० हजार रूपये रक्कम तत्काळ घेण्यात यावी, असे निर्देश खासदारांनी वन परिक्षेत्राधिकारी यांना दिले. वामन मरप्पा हे घरातील कर्तेव्यक्ती असल्याने कुटुंबावर संकट कोसळले आहे. मात्र या संकटाचाही सामना करावा लागेल, असा धिर दिला. इतर शासकीय योजनांचाही लाभ घेण्याचे आवाहन खासदार अशोक नेते यांनी मरप्पा यांच्या कुटुंबियांना केले.
खासदारांना घडले वाघाचे दर्शन
खासदार अशोक नेते मरप्पा यांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा करीत असताना गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्यावर वाघ बसून आहे, अशी माहिती खासदार अशोक नेते यांना देण्यात आली. खासदार नेते आपल्या सहकाऱ्यांसह नाल्याजवळ गेले असता, नाल्यामध्ये वाघ बसून असल्याचे दिसून आले. यावरून वाघ अजूनही रवी परिसरातच असल्याचे स्पष्ट होत आहे.