श्री पद्धत लागवडीच्या क्षेत्रात होणार वाढ
By admin | Published: May 27, 2014 12:48 AM2014-05-27T00:48:56+5:302014-05-27T00:48:56+5:30
जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सन २०१४-१५ चे खरीप नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी
खरीप आढावा : भाजीपाला व फुलशेतीस प्रोत्साहन
गडचिरोली : जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सन २०१४-१५ चे खरीप नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी आढावा घेतला. नियोजनानुसार यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १५ हजार ५०० हेक्टरमध्ये श्री पद्धतीने भात लागवड करण्यात येणार आहे. कृषी विभागाने याबाबतचे लक्ष १०० हेक्टरचे ठेवले आहे. कृषी विभागाच्यावतीने दरवर्षी भात लागवडीच्या श्री पद्धतीबाबत जनजागृती करण्यात येते. गतवर्षीपासून जिल्ह्यात श्री लागवड पद्धतीत वाढ होत आहे. शेती क्षेत्राचा झपाट्याने विकास होऊन उत्पादन वाढावे यासाठी जि. प. च्या कृषी विभागाने यंदा भात लागवडीचे ५० यंत्र खरेदी केले आहेत. या यंत्राच्या सहाय्याने यंदाच्या खरीप हंगामात ५०० हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दुबार पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असून यंदा ७७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रामध्ये दुबार पेरणी करण्यात येणार आहे. अॅपल बोर, केळी, पपई, पेरू आदी फळाच्या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ३ हजार १० हेक्टर क्षेत्रामध्ये फलोत्पादन करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांनी केवळ भाताच्या शेतीवर अवलंबून राहू नये, बारमाही शेती करून प्रगती साधावी, या हेतूने कृषी विभागाने जिल्ह्याच्या भाजीपाला लागवडीच्या क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजन केले आहे. अहेरी उपविभागात यंदा १ हजार ५५० हेक्टर, गडचिरोली उपविभागात ३ हजार ८७५ हेक्टर तसेच देसाईगंज व अहेरी भागात ७ हजार ७५० हेक्टर क्षेत्रात भाजीपाला पिकाची लागवड करण्यात येणार आहे. कृषी विभागाने फुलशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी यंदा फुलशेती लागवडीचे लक्षांक २ हेक्टर इतके ठेवले आहे. झेंडू, मोगरा, शेवंती, गॅलॉर्डीया, गुलाब आदी फुलशेतीची लागवड ३१० हेक्टर क्षेत्रामध्ये होणार आहे. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी बियाणे व खताचे नियोजनही केले आहे. पुरेशा प्रमाणात शेतकर्यांना बियाणे व खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे कृषी अधिकार्याच्यावतीने यावेळी आढावा बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर, कृषी अधीक्षक कार्यालयाचे तंत्र अधिकारी दिक्षीत तसेच उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)