घर मोडले, संसारोपयोगी साहित्य उचलून नेले, आम्ही जायचे कोठे?, अतिक्रमणधारकांचा आर्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 10:46 AM2023-06-23T10:46:09+5:302023-06-23T10:49:55+5:30
मुलाबाळांसह पालिकेत मुक्काम, दुसऱ्या दिवशीही ठिय्या
गडचिराेली : शहरातील गाेकुलनगरातील देवापूर रिठ सर्व्हे क्र. ७८ व ८८ येथील तलावातील झोपडपट्टी अतिक्रमणावर २१ जून रोजी पालिका प्रशासनाने बुलडोजर चालविला. या मोहिमेला विरोध केला म्हणून महिला-पुरुषांसह आबालवृद्धांवर पोलिसांनी लाठी चालवली. आता डोक्यावरचे छत गेले, संसारोपयोगी साहित्यही उचलून नेले, साहेब, आम्ही जायचे कोठे, असा आर्त सवाल अतिक्रमणधारकांनी केला. अतिक्रमणधारक चिल्यापिल्यांसह पालिकेच्या दारात सध्या ठिय्या देऊन आहेत.
गोकुलनगरातील देवापूर रिठ येथील एकतानगरमधील झाेपडपट्टी अतिक्रमण यापूर्वीच हटविण्यात आले होते. परंतु, पुन्हा तिथे शंभरावर कुटुंबे झोपड्या बांधून राहू लागली. पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आव्हान दिले. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. २१ जून रोजी पालिका प्रशासनाने जेसीबी, पाेकलेन, ट्रॅक्टर, अग्निशमन दलाचा बंब अशा साधनसामुग्रीसह कडेकोट पोलिस बंदोबस्त घेऊन देवापूर रिठ गाठले.
अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली. मात्र, अतिक्रमणधारक ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. संसारोपयोगी साहित्यासह अतिक्रमणधारकांना ताब्यात घेतले. हे साहित्य पोलिस मुख्यालयात नेले तर अतिक्रमणधारकांना काही वेळ ताब्यात ठेऊन सायंकाळी सोडून दिले. या दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. झोपडपट्ट्या जमीनदोस्त करून जागोजागी खड्डे खोदण्यात आले. सायंकाळपासून अतिक्रमणधारक नगरपालिका कार्यालयात चिल्यापिल्यांसह ठिय्या देऊन बसले आहेत. २२ जून रोजी रात्री उशिरापर्यंत ७० ते ८० जण पालिकेच्या आवारात ठाण मांडून बसलेले होते.
भूमाफियांना पाठीशी कसे काय घातले...
शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण आहे. काही ठिकाणी अतिक्रमण नियमित करून तेथे मोठमोठ्या इमारती बांधल्या आहेत, तर काही ठिकाणी तुकडे पाडून प्लॉटिंग केली आहे. त्यांना पाठीशी घातले जात आहे. अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांना पायघड्या टाकणाऱ्या प्रशासनाने गोरगरीब, वंचित लोकांना बेघर करण्याचे काम केले आहे. आम्ही या कुटुंबांच्या लढ्यात सहभागी आहोत.
- बाशीद शेख, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, गडचिरोली.
मारहाणीतील एकाची प्रकृती गंभीर
अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करताना पोलिस व अतिक्रमणधारकांत झटापट झाली. यावेळी पोलिसांनी काहींना लाठ्यांनी मारहाण केली. यात पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दामोदर यादव नंदेश्वर (६४), मुनिफा मेहबूब मलिक ( ४०), सीता रामदास सोनूले (६५), जहिर हनिफ अन्सारी (४५), मालाताई भसुराज भजगवळी (५०) यांचा समावेश आहे. यापैकी दामोदर नंदेश्वर हे गंभीर जखमी आहेत. मारहाण झालेल्यांपैकी कोणाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे बाशीद शेख म्हणाले.
पोलिस ठाण्यात तक्रार
दरम्यान, अतिक्रमणधारकांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांविरुध्द गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेतून पालिका प्रशासनाने अन्नधान्य, कपडे, भांड्यांची नासधूस केली. ही अमानवीय कृती आहे. याविरुध्द लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी दिला.
अतिक्रमण हटाव मोहीम सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुनच केलेली आहे. सध्या जमावबंदी आदेश आहेत, अशा स्थितीत हे लोक पालिकेसमोर बसलेले आहेत. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. मुळात त्यांची मागणी व आंदोलन हे नियमबाह्य आहे.
- सूर्यकांत पिदूरकर, मुख्याधिकारी नगरपरिषद गडचिरोली