पालिकेला रिक्त पदांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:35 AM2019-01-05T00:35:07+5:302019-01-05T00:35:55+5:30
स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात वर्ग ३ व ४ ची एकूण ४९ पदे रिक्त आहेत. नगर पालिकेला रिक्त पदाचे ग्रहण कायम असताना शासनाने पुन्हा येथील दोन कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली केली. त्यामुळे पालिकेचा पाणी पुरवठा व लेखा विभाग पांगळा झाला आहे.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या कार्यालयात वर्ग ३ व ४ ची एकूण ४९ पदे रिक्त आहेत. नगर पालिकेला रिक्त पदाचे ग्रहण कायम असताना शासनाने पुन्हा येथील दोन कर्मचाऱ्यांची पुन्हा बदली केली. त्यामुळे पालिकेचा पाणी पुरवठा व लेखा विभाग पांगळा झाला आहे.
गडचिरोली शहरातील जवळपास ५५ हजार लोकसंख्येला मूलभूत तसेच नागरी सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या गडचिरोली नगर पालिकेत गेल्या तीन-चार वर्षांपासून कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाºयांना कामाचा अतिरिक्त भार सांभाळावा लागत आहे.
जिल्हा मुख्यालयाच्या गडचिरोली नगर पालिकेत नगर पालिका संवर्गातील वर्ग ३ ची एकूण ३७ पदे मंजूर आहेत. यापैकी १७ पदे भरण्यात आली असून २० पदे रिक्त आहेत. याच संवर्गातील वर्ग ४ ची एकूण ५२ पदे मंजूर आहेत. यापैकी ३९ पदे भरण्यात आली असून १३ पदे रिक्त आहेत.
राज्य संवर्गातील वर्ग ३ ची एकूण २६ पदे नगर पालिकेच्या आस्थापनेवर मंजूर ओत. यापैकी १० पदे भरण्यात आले असून १६ पदे रिक्त आहेत. नगर पालिकेच्या विविध विभागाचा प्रशासकीय कारभार सांभाळणाºया कर्मचारी (लिपीक) यांचे ३६ पदे रिक्त असल्याने विहित वेळेत प्रशासकीय कामकाज पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत.
अशा परिस्थितीत शासनाच्या वतीने या नगर पालिकेतील दोन महत्त्वाच्या विभागातील कर्मचाºयांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली. लेखा विभागात कार्यरत परीक्षक महेश सावंत तसेच पाणी पुरवठा विभागाचे अभियंता दीपक चौधरी यांची बदली करण्यात आली असून त्यांना भारमुक्तही करण्यात आले. त्यांच्या जागेवर अद्यापही शासनाने दुसºया कर्मचाºयाची नियुक्ती केली नाही. लेखा व पाणी पुरवठा विभागातील महत्त्वाचे पद रिक्त असल्याने या दोन विभागाचा कारभार आता ढेपाळणार आहे.
गडचिरोली नगर पालिकेतील राज्य संवर्ग व नगर पालिका संवर्ग या दोन्ही मधील कर्मचाºयांचे रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी शासन व प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र या संदर्भात कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे पालिकेच्या कामकाजात अडचणी येत आहेत.
आरोग्य निरीक्षक मिळेना
गडचिरोली नगर पालिकेचे तत्कालीन आरोग्य निरीक्षक संतोषवार हे सेवानिवृत्त झाले. त्यावेळीही आरोग्य निरिक्षकाचे एक पद रिक्त होते. मात्र आता येथील आरोग्य निरीक्षकाची दोन पदे रिक्त आहेत. ही पदे राज्य संवर्गात समाविष्ट झाली असल्याने ही पदे भरण्याची जबाबदारी संचालक नगर पालिका यांच्या कार्यालयाकडे आहे. गडचिरोली शहरवासीयांना सोईसुविधा देण्यासाठी ही दोन पदे भरणे अत्यावश्यक आहे.