विवाहितेची आत्महत्या नव्हे हत्या, आई-वडिलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:57 AM2023-06-14T10:57:19+5:302023-06-14T10:57:55+5:30
पोलिसांवर आरोप : चौकशी करून खुनाचा गुन्हा नोंदवा
गडचिराेली : सासरच्या मंडळींकडून पैशासाठी व हुंड्यासाठी माझ्या मुलीचा छळ हाेत असल्याचे तिच्यासाेबत फाेनवरून बाेलताना समजले. दरम्यान, लग्न झाल्यावर दाेन वर्षांत माझ्या मुलीला आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिचा मृत्यू हा संशयास्पद असून, माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही. तिची हत्याच झाली आहे, असा खळबळजनक आराेप करीत सासरकडील दाेषी मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पीडित आई-वडिलांसह नातेवाइकांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
लीना वीरेंद्र उंदीरवाडे (रा. चामोर्शी) असे मृतक विवाहित महिलेचे नाव असून, जावई वीरेंद्र गिरीधर उंदीरवाडे तसेच गिरीधर श्रावण उंदीरवाडे, शाेभा गिरीधर उंदीरवाडे, नरेंद्र गिरीधर उंदीरवाडे व कल्याणी नरेंद्र उंदीरवाडे या सर्वांनी लीनाचा घातपात केला, असा आराेप मृतक लीनाचे वडील उद्धव विठ्ठल वालदे यांनी पत्रपरिषदेत केला.
त्यांनी सांगितले की, पालेबारसा नजीकच्या जनकापूर रिठ येथील आम्ही रहिवासी असून मुलगी लीना वालदे हिचा विवाह चामाेर्शी येथील वीरेंद्र उंदीरवाडे यांच्याशी १५ मार्च २०२१ राेजी झाला. विवाहाला दाेन वर्ष पूर्ण झाले. लीना ही आपल्या घरी चार महिने चांगल्या प्रकारे नांदत हाेती. मात्र, त्यानंतर तिच्या पतीसह सासरच्या सर्व लाेकांकडून हुंडा व पैशासाठी तिचा छळ सुरू केला.
लहान-सहान कारणावरून मारहाण व मानसिक त्रास देणे सुरू झाले. दरम्यान, लीना आमच्याशी माेबाइलवर बाेलताना तुम्ही पैसे पाठवा, माझ्या सासरचे लाेक पैसे मागत आहेत, असे सांगत हाेती. मात्र, आमची परिस्थिती गरिबीची असल्याने आम्ही सासरकडील मंडळींनी मागितलेले पैसे देऊ शकलाे नाही. दरम्यान, २ एप्रिल २०२३ राेजी लीनाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती सकाळी ९ वाजता सासरच्या मंडळींनी फाेनद्वारे दिली, असे वडील उद्धव वालदे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला वडील उद्धव वालदे, आई पुष्पा वालदे, भाऊ मिलिंद वालदे व आनंदराव टेंभुर्णे उपस्थित हाेते.
विषामुळे मृत्यू तरी गुन्हा नाेंद नाही
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात विषामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मग लीनाने विष घेतले तर त्याला कारण काय, की तिला विष जबरदस्तीने दिले गेले, या दृष्टिकाेनातून चामाेर्शी पाेलिसांनी तपास केला नाही, केवळ आमचे थातूर-मातूर बयाण नाेंदवून तसेच मर्ग दाखल करून हे प्रकरण दडपले, असा आराेप उद्धव वालदे यांनी यावेळी केला.
चौकशी करून योग्य कार्यवाही करू
चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी आरोप फेटाळून लावले. न्यायवैद्यक चाचणी अहवाल आल्यावर तसेच आरोपात तथ्य आढळल्यावर योग्य ती कार्यवाही करू, असे त्यांनी सांगितले. कोणालाही अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.