दोन पोलिसांची हत्या; नक्षल्यास जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:06 AM2021-02-02T04:06:26+5:302021-02-02T04:06:56+5:30
नक्षलविरोधी अभियानावर असलेल्या दोन पोलिसांवर गोळीबार करून त्यांना जीवे मारणाऱ्या नक्षल आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियानावर असलेल्या दोन पोलिसांवर गोळीबार करून त्यांना जीवे मारणाऱ्या नक्षल आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यासोबतच २५ हजार रुपयांचा दंडही केला. अनिल ऊर्फ रसूल सुकाणू सौरी ऊर्फ शंकर सुधाकर मिच्चा (३०) असे सदर आरोपीचे नाव असून आहे.
२३ मार्च २०१५ रोजी जिल्हा पोलीस दलाचे सी-६० पथक गट्टा जांबिया पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षलविरोधी अभियान राबवत असताना आरोपी अनिल याच्यासह माओवादी संघटनेचे प्रभाकर आणि ६० ते ७० नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला होता.
नक्षलवाद्यांचा होता कट
या घटनेमध्ये पोलीस नायक दोगे डोलू आत्राम आणि स्वरूप अमृतकर यांना वीरमरण आले. पोलिसांना जीवे मारून त्यांच्याकडील शस्त्रे व दारूगोळा पळवून नेण्याचा नक्षलवाद्यांचा कट होता. एटापल्ली पोलिसांनी कलमान्वये गुन्हा दाखल केला. यातील एक आरोपी अनिल सौरी याला पकडण्यात यश आले.