थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
By संजय तिपाले | Published: May 29, 2024 02:51 PM2024-05-29T14:51:54+5:302024-05-29T14:53:24+5:30
आरोपीला पकडून खांबाला बांधले
गडचिरोली : कोरची तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेवरील बेतकाठी गाव खुनाच्या थरारक घटनेने हादरून गेले. २९ मेरोजी पहाटे ३ वाजता पतीने भरझोपेत पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. त्यानंतर निर्दयी पती रक्ताने माखलेली कुऱ्हाड हाती घेऊन गावभर फिरला. त्यास नंतर मोठ्या भावाने पकडून घरी खांबाला बांधले.
अमरोतीन रोहिदास बंजार ( वय ३३ असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती रोहिदास बिरसिंग बंजार (३७) याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. बेतकाठी गावात राहणारे हे जोडपे मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवत होते. घरगुती कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत असत.
मंगळवारी रात्री नित्याप्रमाणे जेवण करून कुटुंब झोपी गेले. त्यानंतर पहाटे ३ वाजता पती रोहिदास याने पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर निर्दयी रोहिदास बंजार याने हाती कुऱ्हाड घेऊन बाजार चौकात गेला. रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत भल्या पहाटे फिरणाऱ्या रोहिदासने संपूर्ण गावात दहशत निर्माण केली. काही वेळाने कुऱ्हाड पाण्याने धुवून घरामागे झुडुपात फेकून दिली. मोठ्याभावाने गावातील युवकांच्या मदतीने त्यास पकडून घरी खुर्चीत बसवले व खांबाला दोरीने बांधून ठेवले व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. १०८ रुग्णवाहिकेतून मृत अमरोतीन हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रूग्णालयात पाठविला.
खुनाचे कारण अस्पष्ट
कोरची पोलिसांनी रोहिदास बंजार यास ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.. मात्र, अद्याप खुनामागील कारण अस्पष्ट आहे. अधिक तपास सुरु असल्याचे कोरची ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी सांगितले.
मुलीच्या रडण्याच्या आवाजाने खुनाला वाचा
रोहिदासने पत्नीचा खून केला तेव्हा घरात त्यांच्या मुली झोपलेल्या होत्या. पहाटे आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळल्यानंतर आठ वर्षांची सर्वांत लहान मुलगी वैशाली ही हमसून हमसून रडू लागली. तिच्या आवाजाने रोहिदासचा मोठा भाऊ नोहरसिंग हा धावत आला.
चार बहिणी प्रेमाला पारख्या
अमरोतीन व रोहिदास यांना चार मुली आहेत. आईची हत्या, वडील तुरुंगात गेल्याने या चार बहिणींचा आधार हरवला आहे. त्या आई - वडिलांच्या प्रेमाला पारख्या झाल्या आहेत. १५ वर्षांची माधुरी नववीत, १३ वर्षांची मनीषा सातवीत, ११ वर्षीय कौशल्या पाचवीत तर ८ वर्षांची वैशाली दुसरीत शिक्षण घेते. या घटनेने चौघी बहिणी सैरभैर झाल्या असून हुंदके आणि आश्रूंनी वातावरण सुन्न झाले होते.