सहा दिवसांचे मस्टर हजेरीविना
By admin | Published: May 19, 2016 01:12 AM2016-05-19T01:12:40+5:302016-05-19T01:12:40+5:30
आरमोरी तालुक्यातील किटाळी गट ग्रामपंचायतीच्या वतीने सूर्यडोंगरी येथे रोजगार हमी योजनेतून मामा तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे.
कारवाई करण्याची मागणी : सूर्यडोंगरी येथे रोहयोतून सुरू आहे मामा तलावाचे काम
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील किटाळी गट ग्रामपंचायतीच्या वतीने सूर्यडोंगरी येथे रोजगार हमी योजनेतून मामा तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामावरील मस्टर मजुरांच्या हजेरीविना कोरे आहे. तब्बल सहा दिवसांची या कामावरील मजुरांची हजेरी नोंदविण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या कामावरील मजुरांना मजुरीच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित यंत्रणेवरील दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मजूर व नागरिकांनी केली आहे. सूर्यडोंगरी येथे रोजगार हमी योजनेतून मामा तलावाच्या खोलीकरणाच्या कामासाठी आरमोरी पंचायत समितीमधून ८ मे रोजी संगणकीकृत मस्टर काढण्यात आले. २८० मजुरांचे मस्टर काढण्यात आले. यापैकी १६१ मजुरांनी नियमित काम केले. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी १४ मे रोजी सूर्यडोंगरी येथील मामा तलावाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान त्यांनी मस्टरची पाहणी केली असता ८ ते १४ मेपर्यंतचे मजुरांचे मस्टर न भरले असल्याचे आढळून आले. रोहयोच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना दररोज सुरू असलेल्या कामावरील मनुष्यबळ, तेथील व्यवस्था तसेच इतर बाबींची माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र सूर्यडोंगरी येथील या प्रकारामुळे संबंधित यंत्रणा गप्प का, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.
किटाळी ग्रा. पं. अंतर्गत रोहयोच्या कामात नेहमीच अशा प्रकारे आवश्यक कार्यवाही करण्यास विलंब केला जातो. रोहयो कामावरील मजुरांचे मस्टर उशिरा अथवा शेवटच्या दिवशी भरण्याचे प्रकारही येथे होत असल्याचे दिसून येते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी भेटीदरम्यान कामावर असलेल्या मजुरांची प्रत्यक्षात हजेरी घेतली येथे १६१ मजूर उपस्थित असल्याचे दिसून आले. सूर्यडोंगरी येथील असा प्रकार निदर्शनास आल्याने ग्रा. पं. स्तरावरील रोहयो कामाची रेकार्डची तपासणी करण्याची गरज आहे. (वार्ताहर)