मुके, बहिरेपणाला साद घालावी कुणी?
By admin | Published: June 20, 2017 12:43 AM2017-06-20T00:43:19+5:302017-06-20T00:43:19+5:30
घरात आधीच अठराविश्व दारिद्र्य, त्यात माणसाच्या संसाराची दुरवस्था होत असेल तर अशा कुटुंबातील सदस्यांचे जीवन जगणे किती कठीण होत असेल,..
योजनांचा लाभ नाही : देलनवाडीच्या बावणे कुटुंबीयांचे जीवन खडतर
प्रदीप बोडणे । लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : घरात आधीच अठराविश्व दारिद्र्य, त्यात माणसाच्या संसाराची दुरवस्था होत असेल तर अशा कुटुंबातील सदस्यांचे जीवन जगणे किती कठीण होत असेल, याची कल्पना न केलेली बरी. संघर्षमय प्रवास असलेली, अशा प्रकारची करूण कहाणी देलनवाडी येथील बावणे कुटुंबाची आहे.
ताराबाई बावणे या कर्णबधीर आहेत तर त्यांची मुलगी पिंकी ही मतीमंद व मुकी आहे. दहा वर्षापूर्वी नकटू बावणे यांचा मृत्यू झाला आणि बावणे कुटुंबाचा आधारवड हरपला. मतीमंद व बधीर मुलीच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी कर्णबधीर असलेल्या ताराबाई बावणे यांच्यावर आली. मुके व बहिरेपणात मायलेकीच्या दारिद्र्याचा अंधार अधिकच गडद झाला. मतीमंद व मुक्या मुलीच्या जगण्याचा संघर्ष ताराबाईच्या जीवनात अद्यापही कायम आहे. राहण्यासाठी स्वत:चे घरही नाही. सचिन मेश्राम याने आपले जुने घर या मायलेकींना राहण्यासाठी दिले आहे.
समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. मात्र मुक्या, बहिरेपणात खडतर जीवन जगणाऱ्या ताराबाई बावणे व त्यांची मुलगी पिंकी हिला अद्यापही शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना प्रतिमहिना ६०० रूपयांचा लाभ दिला जातो. मात्र सदर मायलेकींना निराधार योजनेचा लाभ मिळत नाही. जिवंतपणी नरकयातना भोगणाऱ्या बावणे कुटुंबीयाकडे अद्यापही शासन व प्रशासनाचे लक्ष नाही. देवाधर्माच्या नावावर लाखो रूपयांची उधळपट्टी करून उत्सव साजरा करणाऱ्या एकाही तथाकथीत सामाजिक कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केली नाही. मुके, बहिरेपणात जीवन जगणाऱ्या मायलेकीच्या आयुष्यात सहकार्य करण्यासाठी सामाजिक दातृत्व कर्त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. या मायलेकींना मदतीचा हात दिल्यास त्यांचे जीवन थोडेफार सुकर होईल.