नगर पंचायत निवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:33 PM2018-05-17T23:33:45+5:302018-05-17T23:33:45+5:30
जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २५ मे २0१८ रोजी तर कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा आणि भामरागड या चार नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे २०१८ रोजी संपणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २५ मे २0१८ रोजी तर कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा आणि भामरागड या चार नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे २०१८ रोजी संपणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्येक नगरपंचायतीला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाकरीता निवडणूक घेण्यासाठी सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी या पाच नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा कालावधी २६ मे २0१८ रोजी संपुष्टात येत आहे. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५१, ५२ नुसार निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता निवडणूकीसाठी सदस्यांची विशेष सभा २५ मे २०१८ रोजी पाच नगरपंचायतीत बोलाविण्यात आली आहे.
अध्यक्षपदाकरीता नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी नगर पंचायत यांच्याकडे १८ मे २०१८ ला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दाखल करावयाचे आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी १८ मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे.
२० मे २०१८ रोजी वैधपणे प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राच्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. २३ मे २०१८ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार येईल. २५ मे २०१८ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा व भामरागड या चार न.पं.च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ३० मे रोजी संपुष्टात येत असून २९ मे रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.