नागपंचमी सण; ‘नागुला चाैथी’साठी वारुळांजवळ गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 12:14 PM2020-11-19T12:14:45+5:302020-11-19T12:15:23+5:30
Gadchiroli News सिराेंचा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये तेलगू भाषिक महिलांनी ‘नागुला चाैथी’ हा सण बुधवारी साजरा केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिराेंचा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये तेलगू भाषिक महिलांनी ‘नागुला चाैथी’ हा सण बुधवारी साजरा केला. गावाबाहेर असलेल्या वारुळांवर पूजाअर्चा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली हाेती. माेठ्या उत्साहात नागुला चाैथी हा सण साजरा करण्यात आला.
मराठी भाषिक जसे नागपंचमी सण साजरा करतात. त्याच धर्तीवर तेलगू महिला नागुला चाैथी हा सण साजरा करतात. दिवाळी पाडव्याच्या दाेन दिवसानंतर हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. सिराेंचासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागुला चाैथी सण बुधवारी साजरा करण्यात आला. या दिवशी महिला पहाटे उठून घरातील कामे आटाेपतात. आंघाेळ करुन घरातील पूजेनंतर नागुला चाैथी पूजेसाठी साहित्याची जुळवाजुळव करुन प्रसाद, फळ, दूध व अन्य साहित्य वारुळाजवळ घेऊन जातात. वारुळपूजेनंतर जवळच्या मंदिरात जाऊन तेथील नागदेवतासह अन्य देवीदेवतांची पूजाअर्चा करतात. गावांमधील महिला आपापल्या परिसरातील वारुळावर हा धार्मिक विधी पार पाडतात. सिराेंचा येथील प्रभा १ व २ मधील महिलांनी वनविभागाच्या आवारातील माेकळ्या जागेत असलेल्या वारुळावर पूजाअर्चा केली. त्यानंतर जवळच्या सिद्धेश्वर हनुमान मंदिरातील देवांचे पूजन केले. घरी जाऊन प्रवेशद्वारावर पूजन करीत प्रसाद अर्पण केला. त्यानंतर घरात प्रवेश केला व कुटुंबीयांना प्रसादाचे वितरण केले. सिराेंचा तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागातही नागुला चाैथी सण साजरा करण्यासाठी वारुळांजवळ महिलांची गर्दी उसळली हाेती.
तीन प्रकारचा प्रसाद केला तयार
नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागाच्या फण्यावर असलेल्या चित्राप्रमाणे वारुळावरील त्रिकाेणी आकाराच्या तीन बिळांची पूजाअर्चा व आरती महिला करतात. फळ, फूल, धूप, गाईचे दूध प्रसाद म्हणून वाटप करतात. परंतु तीन प्रकारच्या प्रसादाला विशेष महत्त्व असते. यामध्ये तीळ व साखरमिश्रीत प्रसाद, भिजवलेली मूगडाळ, भिजू घातलेले तांदूळ व साखरेपासून तयार केेलेला प्रसाद आदी तीन प्रकारच्या प्रसादाचा समावेश आहे. नागुला चाैथीनिमित्त महिलांनी तीन प्रकारचा प्रसाद तयार केला हाेता. हा प्रसाद कुटुंबांसह अनेक परिसरातील अनेक लाेकांना वितरित केला.