फुटबॉल स्पर्धेत नागपूरचा संघ अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:27 AM2018-08-25T01:27:51+5:302018-08-25T01:28:40+5:30

५० व्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त सुभाषग्राम येथे आयोजित राज्यस्तरीय नेताजी कप फुटबॉल स्पर्धेचा समारोप गुरूवारी झाला. या स्पर्धेत नागपूर येथील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५० हजार रूपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Nagpur tops in football tournament | फुटबॉल स्पर्धेत नागपूरचा संघ अव्वल

फुटबॉल स्पर्धेत नागपूरचा संघ अव्वल

Next
ठळक मुद्देसुभाषग्रामात राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप : अनेक संघात रंगले रोमांचक सामने

लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : ५० व्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त सुभाषग्राम येथे आयोजित राज्यस्तरीय नेताजी कप फुटबॉल स्पर्धेचा समारोप गुरूवारी झाला. या स्पर्धेत नागपूर येथील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५० हजार रूपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, वनवैभव शिक्षण मंडळाचे पदाधिकारी बब्बू हकीम, अब्दुल जमीर हकीम, जि.प.सदस्य नवीन शाहा, शिल्पा रॉय, भाजपच्या बंगाली आघाडीचे पदाधिकारी दीपक हलदार, पंचायत समितीच्या उपसभापती आकुली बिश्वास, रतन सरकार, लक्की बोरकर आदी उपस्थित होते.
नेताजी सांस्कृतिक तथा क्रीडा मंडळ सुभाषग्रामच्या वतीने सुभाषग्राम येथे राज्यस्तरीय नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा आ.डॉ.देवराव होळी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड येथील फुटबॉल संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धेत ५० हजार रूपयांचे प्रथम पारितोषिक नागपूर येथील फुटबॉल संघाने पटकाविले. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते या संघाला फुटबॉल चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक, फुटबॉल खेळाडू व प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फुटबॉल खेळाडूंनी राष्ट्रीयस्तरावर पोहोचावे-अशोक नेते
गडचिरोली जिल्ह्याच्या विद्यार्थी व युवकांमध्ये उपजत क्रीडा कौशल्य आहेत. येथील युवकांची शरीरयष्टी मजबूत असल्याने जिल्ह्यातील अनेक खेळाडू विविध खेळाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजे, त्यानंतर हे खेळाडू राष्ट्रीयस्तरावर पोहोचून त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकीक करावा, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी अध्यक्षिय भाषणातून केले. जिल्हास्तरावर विविध खेळातील खेळाडूंना क्रीडांगण निर्माण करून त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी खासदार या नात्याने आपण केंद्र व राज्यस्तरावर पाठपुरावा करणार, असे अभिवचनही खा.अशोक नेते यांनी यावेळी दिले. याप्रसंगी त्यांनी खेळाडूंशी संवादही साधला.
इतर विजेत्या संघाचाही झाला सन्मान
सदर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत एकूण चार पुरस्कार ठेवण्यात आले होते. यामध्ये प्रथम पुरस्कार रोख ५० हजार व चषक, द्वितीय पुरस्कार रोख ३० हजार व चषक, तृतीय पुरस्कार रोख १० हजार व चतुर्थ पुरस्कार रोख ७ हजार रूपये असे ठेवण्यात आले होते. सदर स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकाविणाऱ्या संघाला हे पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना उत्तेजनार्थ वैयक्तिक बक्षीसही देण्यात आले.

Web Title: Nagpur tops in football tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.