आसरअल्लीत सापडलेल्या माशावर नागपुरात संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2016 02:21 AM2016-02-07T02:21:55+5:302016-02-07T02:21:55+5:30
सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली परिसरात जानेवारी महिन्यात सापडलेल्या माशावर इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स नागपूरचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख तथा अभ्यासक ..
राजेंद्र तिजारे यांची माहिती : एलिगेटर असल्याचा अभ्यासकांचा दावा
गडचिरोली : सिरोंचा तालुक्याच्या आसरअल्ली परिसरात जानेवारी महिन्यात सापडलेल्या माशावर इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स नागपूरचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख तथा अभ्यासक प्रा. डॉ. राजेंद्र तिजारे यांनी दीर्घ अभ्यास करून हा मासा एलिगेटर असल्याचे स्पष्ट केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता या दोन मोठ्या नद्या आहे. या नद्यांमध्ये विविध प्रजातीचे प्राणी, मासे आहेत. जानेवारी महिन्यात आसरअल्ली येथे सापडलेल्या माशाचे जीवशास्त्रीय नाव अटऱ्याक्टोस्टीअस स्पाचूला असे असून या माशाचा जबडा रूंद, चपटा असून वरच्या जबड्यातील दात हे अतिशय तीक्ष्ण असतात. हे दात दोन ओळीमध्ये असतात. त्यामुळे याला एलिगेटर फिश असे नाव दिल्या गेलेले आहेत. या माशाची पूर्ण वाढ झालेली नसल्यामुळे त्यांच्या जबड्यात दातांची दुसरी ओळ अपूर्णावस्थेत आहे. हा एक प्राचीन मासा असून याला लिविंग फॉसील (जिवंत जीवाश्म) असेही संबोधल्या जाते. अशा प्रकारचे गुण वैशिष्ट्ये हे क्रिट्याशिअस पीरिअड मधील माशामध्ये पाहायला मिळतात. सद्य:स्थितीत या माशांचे भारतामध्ये अस्तित्व नाही. केवळ अक्व्यरिअम फिश म्हणून याचा वापर केला जातो. परंतु अमेरिकेच्या दक्षिणोत्तर व मेक्सिकोमधील गोड्या पाण्याचे तलाव, नद्या अथवा खाडीचे पाणी यामध्ये या माशांचे वास्तव्य आढळते. सदर मासा लेपिसोस्टीफोर्मीस या वर्गात येत असून पूर्वी या माशाचे नाव ‘लेपीसोस्टीअस स्पाचुला’ असे होते. परंतु १९७४ मध्ये या माशाचे नाव बदलून अटऱ्याक्टोस्टीअस स्पाचुला असे ठेवण्यात आले. जीवाश्मांचा अभ्यास केला असता असे आढळले की, युरोपमध्ये क्रिट्याशिअस व ओलिगोसीन कालखंडात, भारत आणि आफ्रिका या देशात या माशाचे अस्तित्व होते. पुढे हा मासा या भागातून नामशेष झाला. आता केवळ अमेरिकेच्या काही भागात या माशाचे वास्तव्य आहेत.
हा मासा पाणी व हवेत दोन्ही प्रकारे श्वासोच्छवास करू शकतो. त्यामुळे कमी पाण्यातसुध्दा हा मासा फार काळ जिवंत राहू शकतो.
या माशांचा प्रजनन काळ साधारणत: एप्रिल ते जून या महिन्यात असतो. एका प्रजनन हंगामात जवळजवळ दीड लाख अंडी घालतो. अंडी चिकट व लाल रंगाचे असून पाण्यातील वनस्पतींना सदर अंडी चिकटलेली असतात. चुकून मनुष्याकडून या अंडीचे सेवन झाले तर विषबाधा होण्याचा धोका असतो. सदर मासा हा पाण्यामध्ये दबा धरून बसतो व भक्ष्यावर अचानक हल्ला चढवितो.
या माशाचे भक्ष्य पाण्यातील इतर प्रकारचे मासे, सस्तन प्राणी व पाणपक्षी आहे. कदाचित अक्वारिअमचा छंद जोपासणाऱ्यापैकी कुणीतरी या माशाला नदीत सोडलेले असावे व हा मासा गोदावरी मार्ग आसरअल्ली भागात आलेला असावा, असा डॉ. तिजारे यांचा दावा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)