नक्षलवाद्यांनी लावलेले बॅनर जाळून गावकऱ्यांनी केला नक्षल सप्ताहाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:07 PM2017-07-27T18:07:31+5:302017-07-27T18:07:34+5:30
गडचिरोली, दि. 27 - येत्या 28 जुलैपासून सुरू होत असलेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी कापडी बॅनर लावून सप्ताहादरम्यान व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र धानोरा तालुक्यातील मरकेगावच्या परिसरात लावलेले बॅनर गावातील महिला-पुरुषांनी एकत्रित येऊन रस्त्यावर जाळले आणि नक्षल सप्ताहाला प्रथमच खुलेआम विरोध दर्शविला.
अतिदुर्गम आदिवासी भागातील गावक-यांनी एकजुटीने नक्षल सप्ताह न पाळण्याचा निर्धार केला. आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या बंदने काय साध्य झाले? आम्ही नक्षलवाद्यांचा बंद पाळुन आमचा विकास का थांबवायचा? असा परखड सवाल करत गावक-यांनी नक्षलवाद्यांविरोधात आवाज उठवला आहे.
जे नक्षलवादी आपल्या आदिवासी बांधवांची हत्या करतात, जे आपल्या भागाच्या विकासाला विरोध करतात अशा नक्षलवाद्यांच्या बंदला आता आम्ही प्रतिसाद देणार नाही अशी भावना आदिवासी दुर्गम भागातील गावक-यांनी व्यक्त केली. ज्या मरकेगाव भागात 2009 मध्ये नक्षलवाद्यांनी हिंसा घडवुन 15 पोलीस जवानांना मारले त्याच भागात आता सामान्य आदिवासींकडून नक्षलवाद्यांना विरोध होत आहे.