शहरातील नाल्या कचऱ्याने तुंबल्या
By admin | Published: November 10, 2014 10:43 PM2014-11-10T22:43:58+5:302014-11-10T22:43:58+5:30
शहरातील बहुतांश नाल्या कचऱ्याने तुंबल्या असून नगर परिषदेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. नालीतील कचरा जमिनीच्या बरोबर आला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
गडचिरोली : शहरातील बहुतांश नाल्या कचऱ्याने तुंबल्या असून नगर परिषदेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. नालीतील कचरा जमिनीच्या बरोबर आला असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
शहरातील स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी नगर परिषदेकडे ५० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. सदर कर्मचारी दररोज नाल्या उपसण्याबरोबच शहरातील कचरा उचलत असल्याची नेहमीच बढाई मारल्या जाते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती याहून भिन्न आहे. शहरातील काही वॉर्डातील नाल्या सहा महिन्यांहून अधिक कालावधी होऊनही उपसण्यात आल्या नाहीत. नगर परिषदेचे पदाधिकारी, नगर सेवक व अधिकारी तसेच कर्मचारी स्वच्छता अभियान राबविण्याविषयी नागरिकांना सल्ले देण्यात व्यस्त आहेत. मात्र शहरात असलेल्या बकाल व्यवस्थेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. नगर परिषद कार्यालयाच्या समोरच असलेल्य शिवाजी महाविद्यालयासमोरील नाली पूर्णपणे कचऱ्याने तुंबली आहे. नालीतील कचरा पूर्णपणे जमिनीच्या समांतर आला आहे. त्यामुळे या नालीतून पाणी वाहून जाण्यास मार्गच राहला नाही. या भागातील दुकानदार नगर परिषद प्रशासनाला सदर नाली उपसण्याविषयी अनेक वेळा विनंती केली आहे. मात्र नगर परिषदेचा एकही स्वच्छता कर्मचारी आजपर्यंत नाली उपसण्यासाठी इकडे फिरकलाच नाही, असे येथील दुकानदारांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)