नानुभाऊच्या चहाने घातली उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:00 AM2021-02-06T05:00:00+5:302021-02-06T05:00:32+5:30

मंत्री सामंत गडचिरोलीतील दिवसभराचे कार्यक्रम आटोपून गुरूवारी नागपूरच्या दिशेने निघाले होते. आरमोरीतील नवीन बसस्थानकजवळील फूटपाथवर असलेला ‘सुंदर चहा’चा बोर्ड त्यांना दिसला आणि त्यांना चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी क्षणाचाही विचार न करता, त्या चहा टपरीसमोर गाडी थांबवायला सांगितले. मंत्र्यांच्या व्हीआयपी गाडीसह सर्व ताफा इथे का थांबला, असा प्रश्न नानूभाऊसह तिथे उपस्थित सर्वांनाच पडला. पण मंत्री चक्क आपल्या कँटिनवर चहा पिण्यासाठी थांबले म्हटल्यावर नानूभाऊही हरखून गेला.

Nanubhau's tea captivated the Minister of Higher and Technical Education | नानुभाऊच्या चहाने घातली उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना भुरळ

नानुभाऊच्या चहाने घातली उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना भुरळ

Next
ठळक मुद्देताफा थांबवला : टपरीवर उभे राहून घेतला आस्वाद

महेंद्र रामटेके
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : सायरन वाजवत मंत्री महोदयांच्या वाहनांचा ताफा येत होता. अचानक वाहनांची चाके मंदावतात  आणि सर्वांची धावपळ होते. मंत्री महाेदय व्हीयआयपी गाडीतून खाली उतरतात आणि चक्क चहा पिण्यासाठी टपरीसमोर उभे राहतात.  विश्वासच  बसणार नाही, असा हा देखावा आरमोरीकरांनी पाहिला. चहा घेणारे ते मंत्री होते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि त्यांना गरमागरम चहा पाजणारा होता नानूभाऊ अर्थात ज्ञानेश्वर रामदास ढोरे.
मंत्री सामंत गडचिरोलीतील दिवसभराचे कार्यक्रम आटोपून गुरूवारी नागपूरच्या दिशेने निघाले होते. आरमोरीतील नवीन बसस्थानकजवळील फूटपाथवर असलेला ‘सुंदर चहा’चा बोर्ड त्यांना दिसला आणि त्यांना चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी क्षणाचाही विचार न करता, त्या चहा टपरीसमोर गाडी थांबवायला सांगितले. मंत्र्यांच्या व्हीआयपी गाडीसह सर्व ताफा इथे का थांबला, असा प्रश्न नानूभाऊसह तिथे उपस्थित सर्वांनाच पडला. पण मंत्री चक्क आपल्या कँटिनवर चहा पिण्यासाठी थांबले म्हटल्यावर नानूभाऊही हरखून गेला. चहा तयार हाेईपर्यंत जवळपास १५ ते २० मिनिटे ते कँटिनसमोर उभे होते. ज्ञानेश्वरने बनवलेला चहा पिऊन मंत्री सामंत खुश झाले. चहाचे कौतुक करत त्याच्यासोबत फोटोही काढले. सामंत यांच्यासह त्यांच्या ताफ्यातील जवळपास ४० लोकांनी ज्ञानेश्वरने बनवलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. यावेळी आरमोरी येथील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप ठाकूरही उपस्थित होते. 
एखादा मंत्री लहानशा चहा टपरीवर थांबून चहा पित असल्याचे दृष्य अभावानेच पाहायला मिळते. ‘आबा’ अर्थात आर. आर. पाटील यांच्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी हा अनुभव गडचिरोलीकरांना दिला. आरमोरीजवळच्या अरसोडा येथील रहिवासी ज्ञानेश्वर  रामदास ढोरे हा सुशिक्षित बेरोजगार युवक नोकरीच्या मागे न लागता, आरमोरीजवळील नवीन बसस्थानकाजवळ २०१५पासून चहाची टपरी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. त्याच्या कॅन्टीनवर मंत्री चहा पिऊन गेल्याची चर्चा तालुकाभर पसरत आहे. त्यामुळे सध्या ताे चर्चेचा विषय झाला आहे.

ट्वीटमधूनही केले कौतुक 
ज्ञानेश्वर ढोरे यांच्या या चहाचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरूनही कौतुक केले. या ट्विटमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरसोबत काढलेले  तीन फोटोही शेअर केले आहेत. यामुळे आरमोरीतील या चहाची महती सर्वत्र पसरली.

मंत्रालयातून फाेनद्वारे विचारपूस
सामंत यांचा ताफा गेल्यानंतर मुंबई येथील मंत्रालयातील सामंत यांच्या कार्यालयातून ज्ञानेश्वर यांना फोन आला आणि त्यांची विचारपूस करण्यात आली, अशी माहिती ज्ञानेश्वरने ‘लोकमत’ला दिली. यामुळे चहावाल्या ज्ञानेश्वरचे राजकारणात नशीब फळफळणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

 

Web Title: Nanubhau's tea captivated the Minister of Higher and Technical Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.