नागरिकांच्या मुलाखतींवरून ठरणार राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:27 PM2018-08-07T13:27:42+5:302018-08-07T13:28:07+5:30
स्वच्छतेबाबत गावाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांवरूनच संबंधित गावाला स्वच्छतेबाबतचे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षीच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची निवड करताना सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतेबाबत नागरिकांची मते महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वच्छतेबाबत गावाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांवरूनच संबंधित गावाला स्वच्छतेबाबतचे पुरस्कार दिले जात होते. मात्र यावर्षीच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीची निवड करताना सोयीसुविधांबरोबरच स्वच्छतेबाबत नागरिकांची मते महत्त्वाची भूमिका निभाविणार आहेत. नागरिकांच्या स्वच्छतेबाबतच्या विचारांना १०० पैकी सुमारे ३५ टक्के गुण देण्यात आले आहेत.
देशभरातील ९८ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. या गावांमध्ये शाश्वत स्वच्छता राहावी, यासाठी भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने ग्रामपंचायतीचे गुणांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत त्रयस्त संस्थेच्या वतीने गुणांकन होणार आहे. एकूण १०० गुण आहेत. यामध्ये स्वच्छतेबाबतच्या सोयीसुविधांसाठी ३० गुण राहतील. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जाणीव जागृती, नागरिकांचे अभिप्राय, प्रभावी व्यक्तीचे अभिप्राय यांना ३५ गुण राहणार आहेत. तर स्वच्छतेसंबंधी जिल्ह्याने व संबंधित राज्याने केलेली प्रगती यावर ३५ गुण राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील १० ते १६ ग्रामपंचायतीची सर्वेक्षणासाठी नमुना पध्दतीने निवड केली जाणार आहे. त्या गावांना सर्वेक्षणकर्ते भेटी देऊन सोयीसुविधांची पाहणी व नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. सर्वेक्षणासाठी कोणत्या गावांची निवड होणार आहे, याबाबतची माहिती अतिशय गोपनिय ठेवली जात आहे. गावांची नावे सर्वेक्षणकर्त्यांना दिल्ली येथून त्याच दिवशी अगदी वेळेवर कळविले जात आहेत. यामुळे सर्वेक्षणात पारदर्शकता राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर टीम सोमवारी दाखल झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.