तीन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:38 PM2018-08-02T23:38:01+5:302018-08-02T23:43:52+5:30
जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून जाणारा तेलंगणातील निजामाबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूरपर्यतचा राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ सध्या उखडून खड्डेमय झाला आहे. या मार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून जाणारा तेलंगणातील निजामाबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूरपर्यतचा राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ सध्या उखडून खड्डेमय झाला आहे. या मार्गाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. एवढेच नाही तर इंद्रावती व प्राणहीता नदीवरील पुलाचे काम १८ वर्षानंतरही पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या तिन्ही राज्यातील जनतेला प्रवास करणे सोईस्कर व्हावे म्हणऊन केंद्र शासनाने तेंलगणा राज्यातील निजामबाद ते छत्तीसगढ राज्यातील जगदलपूर असा राष्ट्रीय महामार्ग बनविला. त्यातील ५६ किलोमीटरचा रस्ता सिरोंचा तालुक्यातून जातो. या मार्गासाठी कोटयवधी रुपये खर्च करूनही हा मार्ग सुस्थितीत नाही.
याशिवाय सिरोंचा ते असरअल्ली यादरम्यान महामार्गाची चांगलीच दुरवस्था झाली आहे. जिकडे-तिकडे गिट्टी उखडून खड्डे पडले आहेत. १९९८-९९ मध्ये सीमा रस्ता संघटना -(बी.आर.ओ.)च्या माध्यमातून या राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू करण्यात आले. सिरोंचा येथे कार्यालय देखील बांधण्यात आले. सिरोंचा येथून पातागुड़म असा ६५ कि.मी. अंतराचा या राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला होता. या महामार्गात महाराष्ट्र तेलंगना यांना जोड़णारा प्राणहिता नदीवरील पूल व महाराष्ट्र-छत्तीसगडला जोडणारा पातागुड़म गावाजवळील इंद्रावती नदीवरील पूल होता. या पुलांचे काम अंतिम टप्प्यावर असले तरी कासवगतीने चालत आहे.
याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकड़े तक्रारी देण्यात आल्या तरी ड़ोळेझाकपणा केला जात आहे. सिरोंचा ते असरअल्ली हा ३२ कि.मी.पर्यतचा प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून करावा लागतो. ग्रामीण मार्गापेक्षाही या मार्गाची स्थिती बिकट झाली आहे. शासनाने त्वरित या राष्ट्रीय महामार्गाकड़े लक्ष देऊन दुरूस्ती करावी अशी मागणी तालुकावासियांकडून केली जात आहे