राष्ट्रीय महामार्गाचे अतिक्रमण चार दिवसात हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:00 AM2022-05-21T05:00:00+5:302022-05-21T05:00:55+5:30
लहान-मोठ्या अतिक्रमणधारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ नुसार नोटीस बजावण्यात आल्या. त्यात देसाईगंज शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३ सी च्या राजमार्गाच्या जागेवर अनधिकृतरित्या अतिक्रमण करून कब्जा केल्याने अतिक्रमणधारकांना २४ मे च्या आत कब्जा हटविण्याची सूचना दिली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कच्चे व पक्के अतिक्रमण हटविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने हालचाली वाढविल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी देसाईगंज येथील अतिक्रमणधारकांना शुक्रवारी नोटीस बजावत चार दिवसांत अतिक्रमण हटविण्यास सांगितले. ते न हटविल्यास बुलडोझर लावून अतिक्रमण हटविले जाण्याची शक्यता आहे.
साकोली-वडसा-आरमोरी या ३५३ सी राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थायी पट्टेधारकांसह लहान-मोठ्या अतिक्रमणधारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ नुसार नोटीस बजावण्यात आल्या. त्यात देसाईगंज शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३ सी च्या राजमार्गाच्या जागेवर अनधिकृतरित्या अतिक्रमण करून कब्जा केल्याने अतिक्रमणधारकांना २४ मे च्या आत कब्जा हटविण्याची सूचना दिली आहे.
नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग क्र.१४ नागपूर येथे आपल्या जागेबाबत अधिकृत कागदपत्रांसह अभिवेदन करण्याची संधी नागरिकांना दिली जाणार आहे. अशा अभिवेदनधारकांची २३ मे ला पूर्ण सुनावणी करण्यात येणार आहे. या नोटीसचे अनुपालन करण्यात अयशस्वी ठरल्यास अतिक्रमण काढले जाणार आहे.
नगर परिषदही हटविणार अतिक्रमण
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३५३ सी मधील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली असतानाच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांच्या आदेशानुसार रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी लाऊडस्पीकरद्वारा शहराच्या मुख्य बाजारात गाडी फिरवून आवाहन करण्यात आले.
- अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या अजगरी विळख्यात सापडलेले देसाईगंज शहर लवकरच अतिक्रमणमुक्त होईल, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.