जुन्या रस्त्यापेक्षाही राष्ट्रीय महामार्ग अरूंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:04 AM2019-01-18T00:04:52+5:302019-01-18T00:05:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. परंतू हा मार्ग अरूंद करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. परंतू हा मार्ग अरूंद करण्यात आल्यामुळे भविष्यात वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या निधीतून बांधलेल्या रस्त्याची रूंदी दोन्ही बाजूने १५-१५ मीटर असताना आता हा रस्ता १२ मीटरचा कसा झाला? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.
गडचिरोली शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहराच्या चारही मार्गाने बायपास रस्ते तयार करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान शहराला नवीन बायपास मार्ग मंजूर करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. हे आश्वासन पूर्ण करत रस्ता मंजूर करावा. वैधानिक विकास मंडळाच्या निधीतून गडचिरोली शहरात बांधण्यात आलेल्या रस्त्याची रूंदी १५ मीटर होती. त्यानंतर नाली बांधकाम करण्यात आले. परंतु सध्या १२ मीटरचा रस्ता बांधला जात आहे. जुन्या रस्त्यापेक्षाही तीन मीटर रस्ता कमी करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे. महामार्गाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदन देतेवेळी भडांगे यांच्यासह प्रकाश मेहाडिया, देवेंद्र तिवारी, माधुरी केदार, सिम्पल राठोड, अश्विन मेहाडिया, फिरोज पठाण, अंबू राठोड, गौरव सिंघम यांच्यासह गडचिरोलीतील कार्यकर्ते उपस्थित होते.