कृषी महाविद्यालयाला छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:39 IST2019-05-22T23:38:54+5:302019-05-22T23:39:38+5:30
नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात जवळपास ७०० पोलिसांना मतमोजणी केंद्र असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे.

कृषी महाविद्यालयाला छावणीचे स्वरूप
गडचिरोली : नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात जवळपास ७०० पोलिसांना मतमोजणी केंद्र असलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या परिसरात तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.
गेल्या सव्वा महिन्यापासून कृषी महाविद्यालयात बनविलेल्या स्ट्राँग रूममध्ये मतदान यंत्र ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे दिली होती. आता त्यांच्या सोबतीला राज्य राखीव पोलीस दल व जिल्हा पोलीस दलाचे जवान राहणार आहेत.
मतमोजणीच्या वेळी संपूर्ण इमारतीच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य राखीव पोलीस दलाकडे राहणार आहे. इमारतीबाहेरील आवार आणि आवाराबाहेरील परिसरात जिल्हा पोलीस दलाचे जवान तैनात राहणार आहेत. त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान कोणतीही अंतर्गत किंवा बाह्यबाधा येणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न पोलीस विभागाने केल्याचे दिसूा येत आहे.
या बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांचे २० ते २५ अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांसह या कामात महिला कर्मचारीही हाती रायफल घेऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पो.अधीक्षक मोहीत गर्ग व इतर अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
बॉम्ब आणि डॉग स्क्वॉडही तैनात
कृषी महाविद्यालयाच्या भल्यामोठ्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तपासणी करण्यासाठी पोलीस दलाकडे असलेल्या बॉम्ब शोध व नाशक पथकाला तसेच दया व भूमी या दोन श्वानांना तैनात ठेवण्यात आले आहे.